
मुंबई : बहुप्रतीक्षित सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या (एससीएलआर) शेवटच्या टप्प्यातील मार्ग जूनमध्ये खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गाची शेवटच्या टप्प्यातील केवळ फिनिशिंगची कामे शिल्लक राहिली असून, ती पूर्ण करून हा मार्ग लवकरच खुला केला जाणार आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर सांताक्रूझ येथे मुंबई विद्यापीठ चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाहनांची सुटका होणार आहे.
एससीएलआर रस्त्याचे सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तार केला जात आहे. आता अंतिम टप्प्यात पश्चिम द्रुतगती मार्गाला दहिसर दिशेला जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या केबल स्टेड ब्रीजचे काम सुरू आहे. हा पूल ऑर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपातील आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर त्याचे वळण अतिशय तीव्र असून, त्यातून हा पूल देशातील सर्वाधिक तीव्र वळण असलेला पूल ठरणार आहे. केबल स्टेड ब्रीजवर केबल उभारणीचे अवघड काम एमएमआरडीएने यापूर्वीच पूर्ण केले आहे. तसेच या रस्त्यावर स्लॅब उभारण्याचे कामही पूर्ण झाले आहे. आता या स्लॅबच्या डांबरीकरणाचे आणि रस्त्याच्या क्रॅश बॅरिअरची कामे सुरू आहेत.
पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने नियोजन केले आहे. त्यामुळे जूनमध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकेल. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर पश्चिम द्रुतगती मार्गावर उभारण्यात आलेला ऑर्थोपेडिक स्टील डेक स्वरूपातील केबल स्टेड पूल आहे.