
नवी मुंबईतील टी.एस.चाणक्य तलाव परिसरात कचऱ्याचे साम्राज्य
मुंबई: टी. एस. चाणक्य परिसरातील तलावाच्या आसपासच्या भागातील रहिवासी सध्या कचऱ्याच्या समस्येमुळे त्रस्त झाला आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. या परिसरात नियमित साफसफाई करण्यात येत नाही, असा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, टी. एस. चाणक्य तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोंचे आगमन होते. त्यामुळे या परिसरात साचलेल्या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावली नाही, तर त्याचा परिणाम फ्लेमिंगोंच्या अधिवासावर होण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.
नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्रात फ्लेमिंगोंना भरपूर खाद्य मिळत असल्याने तेथे त्यांचा अधिक वावर असतो. फ्लेमिंगोना पाहण्यासाठी मुंबई, नवी मुंबई , पनवेल आदी भागांतील नागरिक मोठ्या संख्येने येथे येतात.
दरम्यान, सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, निर्माल्य आदींचा समावेश आहे. तलाव परिसरात साचलेला कचरा फ्लेमिंगो, तसेच इतर पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतो. पाण्यात मिसळणारा प्लास्टिकचा कचरा, निर्माल्य हे पाण्याचे नैसर्गिक गुणधर्म बदलतात, त्यामुळे फ्लेमिंगोंना आवश्यक असणारे अन्न विशेषत: शैवाळ व सूक्ष्म जीव नष्ट होण्याची शक्यता वाढते. परिणामी, यामुळे या भागातील फ्लेमिंगो अन्यत्र स्थलांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारची अस्वच्छता जैवविविधतेसाठीही धोकादायक ठरू शकते. टी. एस. चाणक्य तलाव परिसरात कचरा साचण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून साफसफाई केली जाते. मात्र, पुन्हा काही दिवसांत परिस्थिती जैसे थे होते. या भागात पर्यावरणप्रेमी वेळोवेळी स्वच्छता मोहिमही राबवितात, तरीदेखील पुन्हा कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याचे पर्यावरणप्रेमी धर्मेश बरई यांनी सांगितले. येथे निर्माल्य कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अनकेदा निर्माल्य बाहेरच फेकण्यात येत असल्याचे निदर्शनास येते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.