
इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट संघातून तीन दिग्गज खेळाडूंचा एकाच वेळी काढल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांना पाकिस्तान संघातून काढले आहे.बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी या तिघांची निवड केली नाही.
बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. २७ मे पासून बांगलादेशविरुद्ध ३ सामन्यांनी टी२० मालिका खेळणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २१ मे रोजी १६ सदस्यीय टी२० संघाची घोषणा केली. पण या मालिकेसाठी निवडलेल्या संघात बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी नाहीत. या संघाची धुरा सलमान अली आगाच्या खांद्यावर दिली आहे. तर शादाब खानला संघाचा उपकर्णधार म्हणून पदभार दिला आहे. पाकिस्तान संघाचा हेड कोच म्हणून जबाबदारी सोपवल्यानंतर माइक हेसनची ही पहिलीच मालिका आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी सारख्या दिग्गज खेळाडूंना संघाबाहेर करण्याचं खरं कारण काही समोर आलेलं नाही. पण पीसीबीने आपल्या प्रेस रिलीजमध्ये स्पष्ट केलं की, संघात त्याच १६ खेळाडूंची निवड केली ज्यांचं पीएसएलमध्ये चांगलं प्रदर्शन राहीलं आहे.
बाबर आझमने पीएसएलच्या १० सामन्यात २८८ धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर रिझवानने 10 सामन्यात एका शतकी खेळीसह 367 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने १० सामन्यात फक्त ११ विकेट घेतल्या. यापूर्वी एप्रिल महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या संघातही या तिघांना स्थान दिलं नव्हतं. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या तिघांना टी20 संघासाठी योग्य नसल्याचं गृहीत धरत आहे.