Tuesday, May 20, 2025

विशेष लेख

व्यक्ती नव्हे, एक संस्था...

व्यक्ती नव्हे, एक संस्था...

डॉ. रघुनाथ माशेलकर : ज्येष्ठ शास्त्रज्ञ


डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुखद आहे. त्यांनी आपल्या क्षेत्रात प्रचंड काम करून ठेवले आहे. काळाच्या ओघात व्यक्ती पडद्याआड जाते पण संस्था उरते. याच न्यायाने जयंत नारळीकर व्यक्ती नव्हे तर संस्था होते, असे मला वाटते. त्यांनी उभी केलेली ‘आयुका’ ही संस्था कायमच नवनवीन पिढ्या घडवत राहणार आहे. या संस्थेच्या रुपाने ते कायमच आपल्यामध्ये राहतील.

माझ्या मते, नारळीकर थोर शास्त्रज्ञ होतेच, तर विज्ञानावरील तेवढेच मोठे भाष्यकार (कम्युनिकेटर) आणि तितकेच चांगले माणूस होते. त्यांच्याठायी होती तेवढी माणुसकी मी अन्य कुठे पाहिलेली नाही. त्यांच्याकडे पाहून नेहमीच इतका मोठा माणूस इतका नम्र कसा असू शकतो, हा प्रश्न पडायचा. तो कधीही सुटणारही नाही, असे आता वाटते.


जयंत नारळीकर यांनी त्यांच्या क्षेत्रात प्रचंड काम करून ठेवले आहे. त्यातही ती केवळ एक व्यक्ती नव्हती तर संस्था होती, असे मला म्हणावेसे वाटते. काळाच्या ओघात व्यक्ती पडद्याआड जाते पण संस्था उरते. याच न्यायाने जयंत नारळीकर कायमच आपल्यामध्ये राहणार आहेत. त्यांनी उभी केलेली ‘आयुका’ ही संस्था कायमच नवनवीन पिढ्या घडवत राहणार आहे. ‘आयुका’विषयी आपल्यापैकी प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे. या संस्थेने आत्तापर्यंत अनेक खगोल भौतिकशास्त्रज्ञ, विश्वशास्त्रज्ञ घडवले आहेत. या सगळ्यामागे डॉ. जयंत नारळीकर यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी सर फ्रेड हॉईल यांच्याबरोबर हॉईल-नारळीकर थेअरी मांडली. हे एक खास मॉडेल होते. खगोल भौतिकशास्त्रातील त्यांचे हे योगदानही अत्यंत महत्त्वाचे म्हणून गणले जाते.


अशा या दिग्गज शास्त्रज्ञाबरोबर काम करण्याची मोठी आणि महत्त्वाची संधी मला मिळाली. राजीव गांधी यांच्या ‘सायन्स ॲडव्हायजरी कमिटी फॉर प्रायमिनिस्टर’ च्या पहिल्या कमिटीमध्ये प्रो. सीएनआर अध्यक्षपदी होते तर मी आणि डॉ. जयंत नारळीकर सदस्य होतो. या कमिटीचे काम करत असताना नारळीकर विज्ञानाकडे, शास्त्राकडे कसे पाहतात एवढेच समजले नाही, तर देशाला विज्ञानाच्या वाटेने पुढे कसे न्यायचे, त्यासाठी धोरणे कशी असावी, मुलांमध्ये विज्ञानाची आवड कशी निर्माण करायची, कुतूहल कसे निर्माण करायचे यासंबंधीचे त्यांचे विचार जाणून घेण्याची संधीही मिळाली. त्याचे महत्त्व किती मोठे होते, हे समजून घेता आले. खरेतर अशाप्रकारे शास्त्रशुद्ध, विज्ञाननिष्ठ विचारांची पायाभरणी करणे हेच तेव्हाचे महत्त्वाचे कामे होते. नारळीकरांच्या मार्गदर्शनाने ते योग्य पद्धतीने पुढे गेले, कार्यान्वित झाले असे म्हणता येईल.


त्यांनी विज्ञानविश्वात मोलाचे काम केलेच त्याचबरोबर त्यावर सोप्या भाषेत पुस्तकेही लिहिली. जनसामान्यांना, अगदी मुलांना समजेल इतक्या सोप्या, साध्या भाषेत मूळ विषयाची मांडणी असल्यामुळे त्यांच्या लेखनाला मोठा वाचनवर्गही मिळाला. याच कामामुळे नारळीकरांना साहित्यिक म्हणून गौरवणारे अनेक पुरस्कारही देण्यात आले. त्यांचे हे योगदानही खूप मोठे आहे. त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तेवढ्याच ताकदीने भूषवले होते. एखाद्या शास्त्रज्ञाने साहित्यविश्वात हे स्थान मिळवण्याची घटनाही दुर्मीळ म्हणावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या युनेक्सो कलगा पुरस्काराचेही ते मानकरी होते. ही मोठी उपलब्धी त्यांची महानता दर्शवणारी आहे. विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये अनेकजण काम करतात. मात्र विज्ञान संवाद प्रत्येकाला जमतोच असे नाही. हा आपला प्रांत नाही, असे काहींचे म्हणणे असते. त्यामुळेच विज्ञान संवाद वाढवणारी, जनसामान्यांना समजेल अशा भाषेत वैज्ञानिक विचार, तथ्ये पोहोचवणारी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच माणसे पाहायला मिळतात. डॉ. जयंत नारळीकर हे अशा मान्यवरांमधील एक महत्त्वाचे नाव होते. त्यामुळेच ते काळाच्या पडद्याआड गेल्याने झालेली हानी खूप मोठी आहे. डॉ. जयंत नारळीकर यांनी विज्ञानाप्रमाणेच सायन्स कम्युनिकेशनमध्येही एव्हरेस्टइतकी उंची गाठली. मला ही बाब विशेष महत्त्वाची वाटते.


समाजामध्ये डॉ. जयंत नारळीकर या नावाला मोठी ओळख होती. प्रचंड लोकप्रियता मिळवलेले हे नाव होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी नेहमीच प्रचंड गर्दी होत असे. यासंबंधीची साधारणत: २०-२५ वर्षांपूर्वीची गोष्ट आज आठवते. तेव्हा ‘इंडियन अकादमी ऑफ सायन्स’ची एक मिटींग होती. त्यामधील एका सत्रात डॉ. जयंत नारळीकर प्रथम बोलणार होते आणि नंतर मी बोलणार होतो. पण त्यांची लोकप्रियता लक्षात घेत मी आयोजकांना माझ्यानंतर त्यांनी बोलावे अशी विनंती केली. कारण अगदी स्पष्ट होते. ते आधी बोलले असते तर त्यांना ऐकल्यानंतर उपस्थित निघून जातील आणि माझे ऐकायला प्रेक्षकच उरणार नाहीत असे कुठेतरी वाटून गेले होते...! ही बाब त्यांची विलक्षण लोकप्रियता दाखवून देण्यास पुरेशी आहे.


मी १९७६ च्या नोव्हेंबरमध्ये परदेशातून भारतात परत आलो आणि काही दिवसांनी ‘नवनीत’ कंपनीच्या मालक ताराताई बोले यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. बोलणे झाले आणि निघताना आशीर्वाद देताना त्या मला म्हटल्या,‘मोठा हो आणि जयंत नारळीकर हो...’. यावरूनच त्यांच्या कामाची, या व्यक्तिमत्त्वाची उंची किती मोठी होती, हे समजते. शास्त्रज्ञ कसा असावा आणि किती मोठा असावा, याचा जणू ते एक मापदंड होते. अत्यंत आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणूनच सर्वांनी त्यांच्याकडे पाहिले. यापुढे अशी व्यक्ती होणे नाही. आधी म्हटल्याप्रमाणे ती व्यक्ती नव्हती तर संस्था होती. म्हणूनच या रुपाने ते अमर आहेत. त्यांचे विश्वाच्या उत्पत्तीविषयीचे काम देशच नव्हे, तर जग कायमच लक्षात ठेवेल.

Comments
Add Comment