
नियमांचे पालन न केल्यास होणार दंडात्मक कारवाई
पुणे:सिंहगड किल्ला हा पर्यटक आणि शिवप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे येथे नेहमीच मोठी गर्दी होत असते. पावसाळा सुरू झाल्यानंतर या किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वाढते. जूनपासून येथे पर्यटनाचा हंगाम सुरू होत असून यंदा पर्यटकांसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. वनविभागाने १ जून २०२५ पासून सिंहगडावर जाणाऱ्यांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमांचे पालन न केल्यास कडक दंडात्मक कारवाई होणार आहे.
तसेच गडावर प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने नुकत्याच झालेल्या बैठकीत प्लास्टिक बंदीचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार, वनविभागाने हा निर्णय घेतला असून १ जूनपासून प्लास्टिक बंदी काटेकोरपणे लागू होईल. पर्यटकांना आता येथे प्लास्टिकच्या बाटल्यांसाठी अनामत रक्कम (डिपॉझिट) भरावी लागेल. गडावरून परतताना ती परतदिली जाईल.
गडावर कोणी प्लास्टिकचा कचरा फेकला, तर त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. त्याचप्रमाणे वनविभागाचे सहायक वनसंरक्षक दीपक पवार यांनी रविवारी सिंहगडावरील विक्रेत्यांची बैठक घेतली. विक्रेत्यांना पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विक्रेत्यांना प्लास्टिक बंदीच्या नियोजनासाठी ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
या नव्या नियमांमुळे सिंहगडावरील स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा वनविभागाकडून व्यक्त केली जात आहे. तर अतिक्रमण हटवल्याने किल्ल्याचे ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्य टिकून राहील.
अतिक्रमणमुक्त किल्ल्यांचा संकल्प
पुणे जिल्हा प्रशासनाने सिंहगडासह सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वनविभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.