Tuesday, May 20, 2025

'ती'ची गोष्ट

मुद्रा-भाग २

मुद्रा-भाग २

मी योगिनीडॉ. वैशाली दाबके


मागील भागात आपण सिंहमुद्रेविषयी जाणून घेतले. या भागात ब्रह्ममुद्रा या करायला सोप्या, पण अतिशय परिणामकारक अशा मुद्रेविषयी आपण जाणून घेणार आहोत.


ब्रह्ममुद्रा -
मस्तक आणि शरीराचा खांद्यांच्या खालचा भाग यांना जोडणारा अवयव म्हणजे मान आणि गळा. या भागात अन्ननलिका, श्वासनलिका, कानाकडून, मुखाकडून आणि नाकपुड्यांकडून येणारे मार्ग एकत्र येतात. म्हणून या भागाला ‘सप्तपथ’ असे नाव आहे. याच भागात पडजीभ आणि टॉन्सिलसही असतात. मानेकडच्या मागच्या बाजूस मज्जारज्जू, मस्तकाकडून येणारे ज्ञानतंतू, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करणाऱ्या नसा, स्वरयंत्र तसेच कंठग्रंथी म्हणजे थायरॉइड ग्लांड्स असे विविध महत्त्वाचे शरीराचे भाग आहेत. त्यामुळे या भागांचं आरोग्य जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी मागील लेखात विस्तारानं सांगितलेली सिंहमुद्रा तसेच दत्तमुद्रा आणि ब्रह्ममुद्रा यांचा फार उपयोग होतो. ब्रह्मदेवाची मुखं ज्याप्रमाणे चार दिशांना असतात त्याप्रमाणे ब्रह्ममुद्रेच्या कृतीत चेहरा उजवीकडे, डावीकडे, वर आणि खाली अशा चार दिशांना वळवला जातो. म्हणून या मुद्रेला ब्रह्ममुद्रा असं म्हणतात.



कृती -
१. पद्मासन, वज्रासन किंवा सुखासनात म्हणजे साधी मांडी घालून बसावं. खाली बसता येत नसेल तर खुर्चीत बसून अथवा पायांत अंतर ठेऊन कमरेवर हात ठेऊन‌ उभं राहूनही ही मुद्रा करता येते.
२. मान, खांदे, पाठकणा समस्थितीत ठेवावा.
३. चेहरा हळूहळू उजवीकडे न्यावा. हनुवटी खांद्याच्या पातळीला येईल इतकी न्यावी.
४. दृष्टी उजव्या बाजूस न्यावी किंवा डोळे अलगद मिटून घ्यावेत.
५. या स्थितीत दोन-तीन श्वास थांबून मान पुन्हा पूर्वस्थितीला म्हणजे मध्यभागी आणावी.
६. याच पद्धतीनं चेहरा डाव्या बाजूस न्यावा. दृष्टी या बाजूला वळवावी किंवा डोळे अलगद मिटून घ्यावेत. मान पुन्हा पूर्वस्थितीला आणावी.
७. यानंतर मान मागच्या बाजूला जितकी खाली जाईल तितकी जाऊ द्यावी. मात्र खांदे आणि कमरेतून मागे झुकू नये. खांदे, कंबर ताठच ठेवावी. या अंतिम स्थितीमध्ये जबडा एकमेकांवर मिटलेला असेल अशी काळजी घ्यावी जेणे करून गळ्यावर पूर्ण ताण येईल. पूर्वस्थितीला यावं.
८. यानंतर मान आणि गळा सैल करून मस्तक पुढच्या बाजूस झुकवावं आणि हनुवटी छातीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. दृष्टी खालच्या बाजूस वळवून स्थिर करावी. मस्तक पुढं नेताना खांदे, छाती किंवा कमरेत झुकवू नये.
वरील चारही अवस्थांमध्ये तीन ते पाच श्वास थांबावं.‌

या चारही कृतींमध्ये मान आणि कंठ यावर आलटून पालटून दाब आणि ताण येतो. ही मुद्रा करतांना चित्त पूर्ण एकाग्र करून या दाब आणि ताणाचा अनुभव घेणं
आवश्यक आहे.
या चारही कृती केल्यानंतर ब्रह्ममुद्रेचं एक आवर्तन पूर्ण होतं.


लाभ :


१. मान आणि कंठ प्रदेशातील स्नायूंना ताण आणि संकोच होत असल्यामुळे हे दोन्ही अवयव लवचिक आणि दृढ होतात.
२. मेंदूकडून ज्ञानेंद्रियांकडे जाणारे ज्ञानतंतू कार्यक्षम होतात.
३. टॉन्सिल्सवरील सूज तसेच टॉन्सिल्सची अनावश्यक वाढ रोखण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होतो.
४. थायरॉईड या अंत:स्त्रावी ग्रंथींचं कार्य योग्य रीतीनं होते.
५. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ही मुद्रा अतिशय लाभदायक आहे.
करायला सोपी असलेली ही मुद्रा म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं मोठं वरदान आहे. नित्य साधनेमध्ये या मुद्रेचा अंतर्भाव
केलाच पाहिजे. निषेध : मानेचे गंभीर आजार असतील अथवा घशाला सूज असेल तर ही मुद्रा करणं टाळावं.


दत्तमुद्रा - स्पॉंडिलायसिस सारखे मानेचे विकार असतील तर ब्रह्ममुद्रेऐवजी दत्तमुद्रा करावी. ब्रह्ममुद्रेमधील पुढच्या बाजूला मान झुकवण्याची क्रिया वगळली तर दत्तमुद्रा होते. दत्तगुरूंच्या मूर्तीमध्ये तीन दिशेला मुखं असतात. या मुद्रेमध्येही मान तीन दिशांना म्हणजे उजवीकडे, डावीकडे आणि वरच्या दिशेला वळवली जाते. म्हणून या मुद्रेला ‘दत्तमुद्रा’ म्हणतात. वर सांगितल्याप्रमाणे तीन दिशांना मान वळवल्यावर एक आवर्तन पूर्ण होतं. ब्रह्ममुद्रेचे लाभ दत्तमुद्रेनेही
प्राप्त होतात.


शारीर मुद्रा - आतापर्यंत आपण हस्तमुद्रा आणि मस्तक ते कंठापर्यंतच्या अवयवांशी संबंधित मुद्रा पाहिल्या. यानंतर शारीर अथवा कायिक म्हणजे प्रामुख्याने छाती, पोट या अवयवांशी संबंधित काही निवडक मुद्रा पाहणार आहोत. या मुद्रांमध्ये अंतिम स्थितीचं आसनांशी साम्य दिसतं परंतु आसनांपेक्षा मुद्रांचं वेगळेपण हे की मुद्रांमुळे अंत:स्त्रावी ग्रंथींच्या कार्याला प्रेरणा मिळते आणि त्या अधिकाधिक कार्यक्षम होतात. शारीरमुद्रांमध्ये योगमुद्रा, विपरीतकरणीमुद्रा, तडागीमुद्रा सामान्यतः केल्या जातात. या मुद्रांची माहिती पुढील लेखात पाहू.

Comments
Add Comment