
मुंबई: लोकलमध्ये प्रवास करताना आता मेट्रोसारख्या नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. पश्चिम रेल्वेच्या १२ स्थानकांवर हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी संबंधित स्थानकांची यादी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आली. या यादीत वांद्रे टर्मिनस, बोरिवली, अंधेरीसह गुजरात विभागातील ९ स्थानकांचा समावेश आहे, अशी माहिती वरिष्ठ रेल्वेअधिकाऱ्यांनी दिली.
१५० वर्षांहून अधिक जुनी वाहतूक प्रणाली असलेल्या लोकलमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या प्रणालीत काळानुसार सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध रेल्वे विभागांकडून संभाव्य स्थानकांची यादी मागवली होती. या प्रकल्पांतर्गत प्रवाशांना मेट्रोप्रमाणे तिकीट तपासणी, सुरक्षा तपासणी आणि फलाटांवर प्रवेश यासाठी ठराविक मार्गाने जावे लागणार आहे. ठराविक मार्गांद्वारे प्रवाशांना प्रवेश मिळाल्याने गोंधळ कमी होईल, तिकीट, सुरक्षा तपासणी काटेकोरपणे करता येईल, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.