
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे
आजकाल लहान मुले आणि तरुण पिढीमध्ये गुन्हेगारीची वाढती प्रवृत्ती, अवैध शस्त्रांची सहज उपलब्धता आणि अमली पदार्थांचे वाढते व्यसन ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. या प्रश्नांची सखोल माहिती घेणे, त्यांची कारणे समजून घेणे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. तरी या लेखातून आपण यामागील कारणे, उपाययोजना यावर प्रकाश झोत टाकणार आहोत.
अवैध शस्त्रे उपलब्धता आणि आकर्षणाची कारणे : अवैध शस्त्रे मिळण्याचे स्रोत याचा विचार केला असता, स्थानिक पातळीवरील विक्रेते यासाठी खूप मोठं कारण आहे. अनेकदा ‘गावठी पिस्तूल’ किंवा स्थानिक पातळीवर बनवलेली शस्त्रे अल्पवयीन मुलांपर्यंत हे विक्रेते पोहोचवतात. हे विक्रेते गुप्तपणे कार्यरत असतात. गुन्हेगारी टोळ्या पण अशा प्रकारे शस्त्र पुरवण्यासाठी सक्रिय असतात. चोरी किंवा इतर मार्गांनी सुद्धा शस्त्रे मिळवली जातात अथवा इतर बेकायदेशीर मार्गांनी मिळवली जातात.
ऑनलाइन उपलब्धता : डार्क वेब किंवा काही विशिष्ट गुप्त ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरूनही शस्त्रे मागवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, जरी हे प्रमाण कमी असले तरी धोकादायक आहे. युवा पिढीचा सामाजिक माध्यमाचा चुकीच्या पद्धतीने वाढता वापर, विविध अॅप्लिकेशन, फ्लॅटफॉर्मचा वापर त्यांना अशा ऑनलाइन शस्त्र विक्री-खरेदीच्या जाळ्यात ओढण्यास कारणीभूत ठरतो. शक्ती प्रदर्शन आणि दहशत पसरवणे यासाठी अर्धवट बुद्धीची मुलं कुठलाच विचार करत नाहीत. शस्त्र बाळगल्याने इतरांवर प्रभाव पडतो, परिसरात दहशत निर्माण होते आणि स्वतःला शक्तिशाली समजण्याची भावना वाढते.
समवयस्कांचा दबाव आणि आकर्षण : मित्रगटात स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी किंवा टोळीत सामील होण्यासाठी, मोठ्या गुन्हेगारांनी आपल्याला जवळ करावे म्हणून सुद्धा काही नवोदित तरुण गुन्हेगार शस्त्रे बाळगतात.
क्षणिक आवेग आणि विचारधारेचा अभाव : अनेकदा तरुण वयात परिणामांचा विचार न करता, केवळ तात्कालिक आवेशात किंवा चुकीच्या विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन शस्त्रे बाळगली जातात. असे करणे बेकायदेशीर आहे, समाजविघातक आहे याची जाणीव त्यांना नसते.
अमली पदार्थ मिळण्याचे स्रोत : अमली पदार्थांचे तस्कर आणि स्थानिक विक्रेते अशा मुलांना आपलं हक्काचं गिऱ्हाईक बनवतात. हे तस्कर शाळा, कॉलेज आणि तरुणांच्या इतर गर्दीच्या ठिकाणी आपले जाळे पसरवतात. काही वेळेस डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणाऱ्या किंवा विशिष्ट प्रकारच्या रासायनिक घटकांचा समावेश असलेल्या औषधांचा (उदा. व्हाईटनरमधील ट्रायक्लोरोइथेन, आयोडेक्स, काही कफ सिरप) गैरवापर नशेसाठी केला जातो.
ताण-तणाव आणि नैराश्य : प्रतिष्ठेचे खोटे प्रतीक म्हणून व्यसन करणे हा आजकाल ट्रेंड झाला आहे. तरुण अमली पदार्थांचे सेवन करणे हे फॅशन किंवा उच्चभ्रू समाजाचे लक्षण समजतात. सिनेमा, वेब सिरीज, व्हीडिओ किंवा सोशल मीडियावरील चुकीच्या चित्रणामुळेही हा गैरसमज पसरतो.
नशेच्या पदार्थांची सोपी उपलब्धता : अमली पदार्थांच्या माफियांकडून जाणीवपूर्वक व्यसन लावणे याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. काही टोळ्या तरुणांना सुरुवातीला मोफत किंवा कमी किमतीत अमली पदार्थ देऊन त्यांना व्यसनाधीन बनवतात. एकदा नशेच्या आहारी गेल्यावर स्वतःवर नियंत्रण गमावाल्यावर आणि हातात शस्त्र असल्यावर ही अर्धवट वयाची पोर स्वतःला हिरो समजू लागतात.
काहीवेळा स्वतःच्या मनात असलेली भीती किंवा असुरक्षिततेची भावना लपवण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी तरुण शस्त्रे बाळगतात. आक्रमकता आणि राग ही सुद्धा मुलांना हत्यार वापरायला प्रेरित करतात. भावनिक अस्थिरता आणि मानसिक विकृती हा पण लक्षात घेण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. काहीवेळा भावनिक अस्थिरता, मानसिक आजार किंवा व्यक्तिमत्त्व विकृती यांमुळे व्यक्ती हिंसक होऊ शकते आणि शस्त्रांचा वापर करू शकते.
बाल गुन्हेगारी, शस्त्रांचा वापर आणि अमली पदार्थांचे व्यसन या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्यापक आणि बहुस्तरीय उपाययोजना करणे आवश्यक आहे.
कौटुंबिक स्तरावर पालकांनी मुलांशी संवाद साधणे, मोकळा संवाद साधणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. मुलांच्या सवयी, मित्र-संगत आणि त्यांच्या वागणुकीतील बदलांवर पालकांनी बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
शैक्षणिक स्तरावर जागरूकता कार्यक्रम राबवणे, शाळा आणि कॉलेजांमध्ये शस्त्रांचे आणि अमली पदार्थांचे दुष्परिणाम, कायदेशीर बाबी आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे, सल्ला, मार्गदर्शन केंद्रे यांची मदत घेणे महत्वाचे आहे. सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग यामध्ये मदत करू शकतो. या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या माध्यमातून जनजागृती आणि व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे.
कायदेशीर आणि प्रशासकीय स्तरावर बाल न्याय मंडळाची प्रभावी भूमिका आहे. बाल गुन्हेगारांच्या बाबतीत बाल न्याय मंडळाने संवेदनशीलतेने योग्य कारवाई करावी, जेणेकरून त्यांना सुधारण्याची संधी मिळेल. या समस्यांवर मात करण्यासाठी पालक, शिक्षक, समाज, शासन आणि स्वतः तरुण पिढी या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य हस्तक्षेप आणि मदतीमुळे अनेक तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवता येऊ शकते.
[email protected]