
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर आज म्हणजेच बुधवार २१ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना रंगणार आहे. हा यंदाच्या आयपीएलमधील ६३ वा साखळी सामना आहे. दिल्ली आणि मुंबई या दोन्ही संघांचा हा तेरावा साखळी सामना आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याचा धोका आहे.
वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात जिंकणाऱ्या संघाला दोन गुण मिळणार आहे. सध्या मुंबईकडे चौदा गुण आहेत तर दिल्लीकडे तेरा गुण आहेत. या परिस्थितीत वानखेडे स्टेडियमवरील सामना जिंकल्यास मुंबई १६ गुण मिळवत लगेच पुढील फेरीत (प्ले ऑफ राउंड) जाईल. पावसामुळे सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या परिस्थितीत मुंबईला २६ मे रोजी पंजाब विरुद्धचा सामना जिंकून पुढील फेरीसाठी पात्र होण्याची एक संधी उपलब्ध असेल. दिल्लीला पुढील फेरीत जाण्यासाठी मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांविरुद्ध जिंकणे आवश्यक आहे.
हवामान खात्याने बुधवार २१ मे रोजी मुंबईत संध्याकाळी सहा ते सात दरम्यान पावसाची सोळा टक्के शक्यता वर्तवली आहे. तसेच संध्याकाळी सात ते रात्री अकरा दरम्यान पावसाची शक्यता फक्त सात ते आठ टक्के वर्तवली आहे. बीसीसीआयने पावसाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या नियमांत बदल केला आहे. याआधी आयपीएलच्या साखळी सामन्यांच्या फेरीत (लीग मॅच राउंड) पावसामुळे एक तास वाया गेला तर षटकांमध्ये कपात केली जात होती. नव्या नियमानुसार पावसामुळे दोन तास वाया गेले तरच षटकांमध्ये कपात केली जाणार आहे. नाही तर ठरल्याप्रमाणे २० षटकांचा सामना होईल.
मुंबई इंडियन्सचे शेवटचे दोन साखळी सामने
बुधवार २१ मे २०२५ - वानखेडे स्टेडियम, मुंबई - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
सोमवार २६ मे २०२५ - सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर - पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
दिल्ली कॅपिटल्सचे शेवटचे दोन साखळी सामने
बुधवार २१ मे २०२५ - वानखेडे स्टेडियम, मुंबई - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
शनिवार २४ मे २०२५ - सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर - पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स