
मुंबई: इंडियन प्रीमीयर लीगच्या फायनल सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएलचा अंतिम सामना आता नव्या वेळापत्रकानुसार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अनेक बैठकांदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, प्लेऑफचे पहिले दोन सामने क्वालिफ़ायर १ आणि एलिमिनेटर अनुक्रमे २९ मे आणि ३० मेला मुल्लांपूर, न्यू चंदीगड येथे खेळवले जाऊ शकतात. या ठिकाणांना निवडण्यामागे बीसीसीआयसाठी प्राथमिक विचार होता हवामानाची स्थिती. देशात हळू हळू मान्सूनला सुरूवात होत आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार आयपीएल २०२५चा फायनल सामना कोलकाताच्या इडन गार्डन्समध्ये रंगणार होता. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावांमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. यानंतर १७ मे पासून पुन्हा या लीगची सुरूवात झाली होती. याच कारणामुळे बीसीसीआयलाही वेळापत्रकात बदल करावा लागला होता. फायनलचा सामना आता २५ मेच्या जागी ३ जूनला खेळवला जाईल.
आयपीएलचे वेळापत्रक
क्वालिफ़ायर १- २९ मे मुल्लांपूर, न्यू चंदीगड
एलिमिनेटर - ३० मे मुल्लांपूर, न्यू चंदीगड
क्वालिफ़ायर २ - १ जून, अहमदाबाद
फायनल - ३ जून, अहमदाबाद