Wednesday, May 21, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

UPSC ची फसवणूक करणाऱ्या पूजाला खून केला नाही म्हणून जामीन

UPSC ची फसवणूक करणाऱ्या पूजाला खून केला नाही म्हणून जामीन
नवी दिल्ली : UPSC (Union Public Service Commission) अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या पूज खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. पूजावर फसवणुकीचा आरोप आहे याची नोंद घेताना तिने हत्या केलेली नाही अशी टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

पूजाने कोणता गंभीर गुन्हा केला आहे ? ती ड्रग्ज माफिया किंवा अतिरेकी नाही, तिने हत्या केलेली नाही, ती एनडीपीएस कायद्यांतर्गत आरोपी नाही; अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करताना केली. पूजावर जे आरोप आहेत त्यांचा तपास करण्यासाठी एखादी व्यवस्था अर्थात सॉफ्टवेअर हवे. यामुळे निश्चित वेळेत तपास करुन पुढील कारवाई करता येईल. पूजाने आतापर्यंत सर्व काही गमावले आहे. पूजाला आता कुठेही नोकरी मिळणार नाही; असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना आणि सतीश चंद्र शर्मा म्हणाले.

नागरी सेवा परीक्षेत अपंगत्व आणि ओबीसी आरक्षणाचा गैरफायदा घेणे. आरक्षणाच्या तरतुदींचा गैरफायदा घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक करणारी माहिती सादर करणे; असे गंभीर आरोप पूजा खेडकरवर आहेत. या प्रकरणात सुरू असलेल्या तपासाला पूजाने सहकार्य केलेले नाही. ही कारणं देत दिल्ली पोलिसांच्या वकिलाने पूजाच्या अटकपूर्व जामिनाला तीव्र विरोध केला. यावर बोलताना प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थिती लक्षात घेता, दिल्ली उच्च न्यायालयाने पूजाला जामीन मंजूर करायला हवा होता असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरला तपास कामात सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

पूजा खेडकरने आरक्षणाचे फायदे मिळवण्यासाठी २०२२ च्या यूपीएससी परीक्षेच्या अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) दाखल केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे जुलै २०२४ मध्ये खेडकरविरुद्ध बनावट कागदपत्रे, फसवणूक, आयटी कायद्याचे उल्लंघन आणि अपंगत्व कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रे तयार करण्याकरिता मदत करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पूजाची काही काळ कोठडीत चौकशी आवश्यक आहे, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने पूजाने हत्या केलेली नाही, अशी टिप्पणी करत तिला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
Comments
Add Comment