
मुंबई : मुंबई-गोवा महामार्ग वर्षानुवर्षे रखडल्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना दरवर्षीच त्रास सहन करावा लागतो. समुद्रमार्गे प्रवासाची सोय होणार असल्याने आता हा प्रवास काहीसा सुखद होणार आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेत गणपतीत समुद्र मार्गे प्रवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्यामुळे आता मुंबईतून साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे. यासाठी एम टू एम बोट वापरली जाणार असून, येत्या २५ मे रोजी ती मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे.
मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार, अशी मोठी घोषणा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत आता कोकणात प्रवास करता येणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांसाठी ही आनंदाची बातमी असून दरवर्षी होणाऱ्या प्रवासासंदर्भातील त्रासापासून काही अंशी सुटका होणार आहे.