Wednesday, May 21, 2025

रायगड

Fishing : मासेमारी बंदी आधीच मच्छीमार नौका किनाऱ्यावर दाखल

Fishing : मासेमारी बंदी आधीच मच्छीमार नौका किनाऱ्यावर दाखल

अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा मच्छीमारांना फटका


अलिबाग :अवकाळी पावसासह जोरदार वाऱ्याचा मोठा फटका मासेमारी व्यवसायाला बसायला लागल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमार नौका परत किनाऱ्यावर दाखल झाल्या आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम संपण्यापूर्वीच १५ दिवस आधीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे.


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशाराही दिला आहे. हा इशारा मिळताच खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका माघारी फिरल्या आहेत. मागील दोन आठवडे मच्छीमारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणावर जवळा सापडला होती. त्यामुळे मच्छीमारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात चांगला व्यवसाय करून बोटी किनाऱ्यावर आणण्याचा त्यांचा मानस होता; परंतु निसर्गाने त्यांच्यावर अवकृपा केल्याने मच्छीमारांचे सारे गणितच बिघडले गेले.


हंगामातील शेवटचे दिवस महत्त्वाचे असतात. या काळात जास्तीत जास्त मासळी पकडून हंगामातील नफा वाढवण्याचा मच्छीमारांचा प्रयत्न असतो. यावेळी तसाच मानस मच्छीमारांचा होता. शेवटच्या टप्प्यासाठी आठ हजार किलोलीटर इतका डिझेल कोटाही मंजूर झाला आहे; परंतु वादळी हवामानामुळे मच्छीमारांचे शेवटचे काही दिवस फुकट जाणार असे चित्र आहे. पावसाळ्यात समुद्र खवळत असल्याने मासेमारी बोटींना नुकसान होण्याची शक्यता असते. हा कालावधी मत्स्यजीवांच्या प्रजननाचा असल्याने मत्स्यजीव अंडी घालण्यासाठी किनाऱ्यालगत येतात. त्यांची शिकार थांबविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने पावसाळ्यात मासेमारीवर बंदी घातली जाते.


हवामान विभागाने वादळाची सुचना दिल्यानंतर काही मच्छीमारांनी मासेमारीस जाण्यास टाळले आहे. वादळी वाऱ्यामुळे अलिबाग, साखर आक्षी, बोडणी येथील नौका भरकटल्या होत्या, तर काहींचे नुकसानही झाले. सध्या अलिबागसह साखर, बागमांडला, भरडखोल, जीवना, करंजा, रेवस अशा प्रमुख बंदरांवर नौका उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत. मासेमारी नौकांवर काम करणाऱ्या कामगारांच्या हाताशी काम नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हवामान शांत झाल्यानंतर मासेमारी व्यवस्थित होईल, याबद्दलही कोणतीच शाश्वती नसल्याने परप्रांतीय कामगार आपल्या गावाकडे जाण्याची तयारीत असून, दुसरीकडे वादळी परिस्थितीने जिल्ह्यात सुमारे १० हजार मच्छीमारी नौका किनाऱ्यावर विसावल्या आहेत.


मासेमारी बंदीची अधिसूचना अद्याप आलेली नाही; परंतु नेहमीप्रमाणे १ जूनपासून मासेमारी बंद होईल, हे सर्व मच्छीमारांना माहिती आहे. त्यानुसार मासेमारी बंदी लागू झाल्यानंतर नौका बंदरात आणून सुरक्षित नांगरून ठेवतात. सध्या वातावरण बिघडल्याने नौकाबंदी कालावधी सुरू होण्यापूर्वीच किनाऱ्यावर आल्या आहेत.
- संजय पाटील, (सहाय्यक उपायुक्त, मत्स्यव्यवसायविभाग, रायगड)
Comments
Add Comment