
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तातडीने कार्यवाही सुरू
अलिबाग : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागासह रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या पुलांची पावसाळ्यापूर्वी पाहणी करून त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानुसार दोन्ही विभागांतील बांधकाम विभाग कामाला लागले आहे.
ग्रामीण भागाचा विकास हा रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साधला जातो. गावे, वाड्यांसह मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या साकवांची देखभाल दुरुस्ती व नविन साकव बांधणीचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत केले जाते. जिल्ह्यात गाव व वाड्यांना जोडणाऱ्या साकवांची संख्या ८० हून अधिक आहे, तसेच शासनाच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित सुमारे ७० हून अधिक पूल आहेत. महामार्गासह जिल्हा रस्त्याला जोडणाऱ्या या पुलांची दुरुस्ती बांधकाम विभागाद्वारे केले जाते. जिल्ह्यातील अनेक पुलांची वयोमर्यादा ३० वर्षांपेक्षा अधिक असल्याने परिणामी अतिवृष्टीमुळे पूल कोसळण्याचा धोका अधिक असतो.
महाड येथील सावित्री पुलाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत धोकादायक पुलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तत्काळ करावी व पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत. तसेच रस्त्यावरील खड्डे, साईडपट्टी भरुन घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, बोर्ड डेव्हर्सनचे बोर्ड, ब्लॅक स्पॉटवर रिफ्लेक्टर्स बसवावेत अशी सुचना बांधकाम विभागासह जिल्हा परिषद बांधकाम विभागाला केली आहे. या सुचनेनंतर जिल्ह्यातील दोन्ही बांधकाम विभाग कामाला लागले असून, वेगवेगळ्या पुलांची पाहणी करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कार्यवाही बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे.
पुलांची पाहणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तयारी केली आहे. अहवाल मागविण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. अशी माहिती रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल देवांग यांनी दिली, तर पुलाची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. ज्या पुलांची देखभाल दुरुस्ती करायची आहे, त्या पुलांची देखभाल दुरुस्ती पाहणी करून केली जाईल अशी माहिती सार्वजनीक बांधकाम विभागाचे कतार्यकारी अभियंता जे.ई. सुखदेवे यांनी दिली.