
नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबुझहमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. दंतेवाडा, नारायणपूर, विजापूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलात चकमक सुरू आहे. आतापर्यंत २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. अनेक नक्षलवादी जखमी झाले आहेत.
सुरक्षा पथकांकडून यावेळी जिल्हा राखीव रक्षक हे नक्षलवाद्यांविरुद्धच्या चकमकीत आघाडीवर आहेत. दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. अनेक नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरक्षा पथकांना नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईसाठी मार्गदर्शन करत आहेत. छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या ताज्या कारवाईत नक्षलवादी रुपेश आणि आणखी काही नक्षलवाद्यांचे नेते यांना सुरक्षा पथकांनी घेरले आहे.
नक्षलवाद्यांच्या सामर्थ्याचा बीमोड करण्यासाठी व्यापक कारवाई सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा पथकांकडील एक जवान जखमी झाला आणि एक जण हुतात्मा झाला.