Wednesday, May 21, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

मोठी बातमी! काँग्रेसचा माजी मंत्री शिंदेंच्या गळाला! सोलापूरमधील बालेकिल्ल्यालाच सुरुंग!

मोठी बातमी! काँग्रेसचा माजी मंत्री शिंदेंच्या गळाला! सोलापूरमधील बालेकिल्ल्यालाच सुरुंग!

शिंदेंच्या एका भेटीने काँग्रेसला हादरा?


सोलापूर : सोलापुरातून एक मोठी आणि धक्कादायक राजकीय बातमी समोर येत आहे. देशाचे माजी गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, तसेच त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे या दोघांनाही अचानक चकित करणारी ही घडामोड आहे.


काँग्रेसचे अत्यंत विश्वासू आणि शिंदे कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी एक असा निर्णय घेतला आहे, ज्याने सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.


म्हेत्रे यांनी काँग्रेसला अखेरचा नमस्कार करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याचे समोर आले असून, याच बैठकीनंतर त्यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे सांगितले जात आहे.



ज्यांनी एकेकाळी काँग्रेससाठी चार वेळा आमदारकी मिळवली, राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून काम पाहिलं ते म्हेत्रे आता धनुष्यबाण हाती घेणार? काँग्रेससाठी ही केवळ गळती नाही, तर त्यांच्या सोलापूरमधील बालेकिल्ल्यालाच सुरुंग लागल्याचा इशारा आहे.


अनेक दशकांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले म्हेत्रे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. ३१ मे रोजी अक्कलकोटमध्ये एका जाहीर कार्यक्रमात ते अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.



म्हेत्रेंचा शक्तीप्रदर्शनातून संदेश


म्हेत्रे यांनी नुकतीच सोलापूरच्या रेवणसिद्धेश्वर सांस्कृतिक भवनात बैठक घेऊन ताकद दाखवली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश साठे, महिला आघाडीच्या अनिता माळगे आणि इतर स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.



'हा माझा नव्हे, कार्यकर्त्यांचा निर्णय'


माध्यमांशी बोलताना म्हेत्रे म्हणाले, "काँग्रेसने खूप काही दिलं, पण २००९ पासून आमचं वजन कमी करण्यात आलं. कार्यकर्त्यांनाही त्रास सहन करावा लागत होता. हा निर्णय माझा वैयक्तिक नाही, तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे." त्यांनी पुढे नमूद केले की, "शिंदे एक काम करणारा नेता आहे, म्हणून आमचे कार्यकर्ते म्हणाले, आता धनुष्यबाणच हाती घ्या."



राजकीय इतिहास


सिद्धराम म्हेत्रे हे चार वेळा अक्कलकोट मतदारसंघातून आमदार झाले आहेत. त्यांनी राज्यात गृहराज्यमंत्री आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ते मंत्रिमंडळात होते. मात्र, सलग तीन वेळा झालेल्या पराभवानंतर ते नाराज होते. विशेष म्हणजे, प्रणिती शिंदे सोलापुरात दौऱ्यावर असतील, तर म्हेत्रे हमखास उपस्थित राहत असत. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाने शिंदे आणि शिंदे गटाचे वजन सोलापूरात वाढणार आहे.



काँग्रेसपुढे आव्हान


या आधी संग्राम थोपटे, रवींद्र धंगेकर यांसारख्या नेत्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आता म्हेत्रेसारखा ज्येष्ठ नेता देखील जाणार असल्यामुळे सोलापुरात काँग्रेसची पकड खिळखिळी होण्याची चिन्हं आहेत. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने हा निर्णय काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतो.

Comments
Add Comment