
बदलापूर:ऐरवी मे महिन्यात तापमानामुळे घामांच्या धारांत ओले होण्याची वेळ येते. मात्र यंदाच्या वर्षात ठाणे जिल्ह्यात मे महिना हा पावसामुळे सर्वात ओला मे महिना ठरल्याचे समोर आले आहे. खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत बदलापुरात झालेला पाऊस गेल्या १३ वर्षांतील सर्वाधिक ठरला आहे. आतापर्यंत बदलापूर शहरात १०७ मिलीमीटर पावसाची नोंदझाली आहे.
येत्या काही दिवसांत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. रस्त्यांवर दुपारच्या वेळी प्रवास करणेही अवघड होऊन बसते. मात्र यंदाचा मे महिना तसा ठरला नाही. सुरुवातीला पश्चिम विक्षोभामुळे राज्यात आणि विशेषतः कोकण भागात पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मोसमी पावसाचे अंदमानात लवकर आगमन झाले. त्यामुळे ज्या पूर्वमोसमी किंवा वळव्याच्या पावसाच्या सरी मे महिन्याच्या अखेरीस बरसतात. त्या सरी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कोसळल्या. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोसळलेला पाऊस हा एका दिवसाचा ठरला नाही. त्यानंतर पुढचे काही दिवस वातावरणात पाऊससदृश्य स्थिती होती. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट दिसून आली, तर दुसऱ्या आठवड्यातही पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. पावसाचे प्रमाण एका तासात इतके होते की बदलापूरसारख्या शहरात नाले तुंबले आणि रस्त्यावरच्या वाहतुकीवर परिणाम झाला. सध्या मे महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. मात्र तरीही पावसाची स्थिती कायम आहे.
पुढचे आणखी काही दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षात मे महिन्यात ठाणे जिल्ह्यात गेल्या १३ वर्षांतला सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. बदलापुरात मे महिन्यात सोमवारपर्यंत तब्बल १०७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस गेल्या १३ वर्षांत झालेला सर्वाधिक पाऊस आहे. तसेच येत्या काळात पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मे महिन्यातील पावसाचा आकडा वाढण्याची शक्यताही मोडक यांनी व्यक्त केली आहे.