
मुंबई: मुंबईत खच्चून भरलेल्या रेल्वेच्या डब्यात जागेवरून तसेच इतर किरकोळ कारणांवरुन वाद विवाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. त्यासंबंधीत व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात. मात्र अलीकडील एका व्हीडिओमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचे कारण म्हणजे, या व्हीडिओत मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका महिलेला पुरुष प्रवाशी बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. जो अनेकांचे मन विचलित करत आहे. (Woman Assaulted by Male Passenger)
सोमवारी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते अंबरनाथ या प्रवास करणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये, दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यात एका पुरुष प्रवाशाने महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे आणि राखीव डब्यात अनधिकृत प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यात झाला वाद
मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये संध्याकाळी खच्चून भरलेल्या दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यातला हा वाद आहे. एक मिनिट आणि १४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये, एक पुरुष प्रवासी महिलेशी आक्रमकपणे वाद घालताना दिसतो आणि नंतर तिच्यावर हल्लाच करतो. इतर प्रवाशांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करूनही, तो पुरुष महिलेला मारहाण करतच राहतो. आरक्षित कोचमध्ये अनधिकृत प्रवाशांनी जागा घेतल्याच्या वादातून हा संघर्ष झाल्याचे मानले जाते.
A disturbing video showing a woman being assaulted inside a Mumbai local train @fpjindia @DGPMaharashtra @Central_Railway @drmmumbaicr @RailMinIndia @AshwiniVaishnaw pic.twitter.com/DAGt3rGnua
— Kamal Mishra (@Yourskamalk) May 20, 2025
मध्य रेल्वेने अद्याप तरी यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केलेले नसले, तरी सोशल मीडियावर संबंधित पुरुषावर त्वरित कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोच आरक्षण नियमांची चांगली अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.