Sunday, October 26, 2025
Happy Diwali

गच्चीवर गेली आणि एका फोटोसाठी गमावला जीव!

गच्चीवर गेली आणि एका फोटोसाठी गमावला जीव!

मुंबई : ढगाळ आकाश, थंड वाऱ्याची झुळूक आणि संध्याकाळचा रम्य क्षण... फोटोसाठी अगदी योग्य वेळ! पण त्या एका क्षणात एका कुटुंबाचे संपूर्ण आयुष्यच कोसळून गेले. दहिसरच्या मिस्किटा इमारतीत रहाणारी १६ वर्षांची जान्हवी चावला गच्चीवर फोटो काढण्यासाठी गेली होती. पण फोटो काढत असताना ती त्या गच्चीवरून खाली पडली आणि अखेरचा श्वास घेतला.

जान्हवीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तिचं आयुष्य पुढे किती उजळणार होतं, किती स्वप्नं उराशी बाळगलेली होती. पण रविवारी संध्याकाळी, ती गच्चीवर गेली आणि तिथून थेट सातव्या मजल्यावरून खाली पडली. फोटो काढत असताना अचानक तिचा तोल गेला, आणि क्षणभरात काळाने तिला गाठलं.

तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी हताशपणे तिचा मृत्यू घोषित केला. विशेष म्हणजे जान्हवीचे वडील त्या क्षणी इमारतीखालीच होते. त्यांच्या डोळ्यांसमोरच त्यांच्या लेकीचं हे भयानक अपघाती अंत घडलं.

या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली असून, नेमकं काय घडलं याचा शोध सुरू आहे.

जान्हवीचं हसतं-खेळतं आयुष्य, एका क्षणात असं संपेल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. एका फोटोसाठी गेलेली जान्हवी पुन्हा कधीच घरात परतली नाही... आणि मागे राहिलं ते फक्त अश्रूंचं आणि आठवणींचं गाठोडं.

Comments
Add Comment