
एक तेजस्वी तारा… जो केवळ आकाशात नाही, तर भारतीय विज्ञानविश्वातही चमकत होता… अखेर आज अनंताच्या प्रवासाला निघालाय. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनानं विज्ञानाच्या आकाशात काळोख पसरलाय. खगोल शास्त्रज्ञ म्हणून त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती होती.
खगोलशास्त्र हा सामान्य माणसाला कठीण वाटणारा विषय, पण जयंत नारळीकरांनी तो सामान्यांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या लेखणीने विज्ञानात रस निर्माण झाला. "आकाशाशी जडले नाते", "टाइम मशीनची किमया", "अंतराळातील स्फोट" अशा पुस्तकांनी त्यांनी विज्ञान रंजक केलं.
पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी वयाच्या ८६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. केंब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेऊन त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम सुरू केलं. त्यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे आयुका या संस्थेची स्थापना.
डॉ जयंत नारळीकर यांनी रसाळ भाषेत मराठीमधून अनेक विज्ञानकथा लिहिल्या. 2021 मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलंय. आकाशाशी जडले नाते या पुस्तकाला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
जयंत नारळीकर यांनी अनेक ग्रंथ आणि पुस्तकं लिहिलीत यात अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे, नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, Facts And Speculations In Cosmology, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, आदी मोठी साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे.
डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. आई सुमती या संस्कृत विदूषी होत्या. विज्ञानाचं बाळकडू घरातूनच मिळालं आणि पुढे डॉ. जयंत नारळीकर हे भारतातच नव्हे तर जगात ख्याती मिळवणारे वैज्ञानिक ठरले.
नारळीकर यांना अनेक पुरस्कार आणि मानचिन्हं मिळाली. यात पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, भटनागर पुरस्कार, एम. पी. बिर्ला पुरस्कार, ‘चार नगरांतले माझे विश्व’या मराठी आत्मचरित्राला २०१४ मध्ये दिल्लीत साहित्य अकादमी पुरस्कार, फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार आणि २०१२ मध्ये अमेरिकेतील साहित्य विषयक जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.
"याला जीवन असे नाव…"…असं सांगणाऱ्या नारळीकरांनी अखेर अनंताच्या मार्गावर पाऊल टाकलंय. त्यांच्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा आणि लेखनाचा प्रकाश युगानुयुगे आपल्या पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील. खगोलशास्त्रातील त्यांचं योगदान आपल्या सर्वांना सदैव स्मरणात ठेवणारं असेल. डॉ. जयंत नारळीकर – एक तारा… जो आता आकाशाचा भाग बनलाय! त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.