
पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यभर अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया लागू केली आहे. त्यासाठी राज्यभरातील ९,२९४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ ते २८ मेदरम्यान खुली राहणार आहे.
पहिल्या फेरीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना शंभर रुपये शुल्क भरावे लागेल आणि एक ते दहा प्राधान्यक्रम निवडता येतील. तात्पुरती गुणवत्ता यादी ३० मे रोजी, अंतिम यादी ३ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ६ ते १२ जूनदरम्यान प्रवेश घ्यावा लागेल.
या प्रक्रियेसाठी https://mahafyjcadmissions.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध असून, २० लाखांहून अधिक जागा विविध शाखांसाठी आहेत. राखीव कोट्यांसाठीही अर्ज करता येणार असून, त्यावर प्रवेश ५ जूनपासून सुरू होतील.
विद्यार्थ्यांसाठी १९ व २० मे रोजी अर्ज भरण्याचा सराव ठेवण्यात येणार असून २० मेच्या रात्री संकेतस्थळावरून तो अर्ज हटवण्यात येईल व २१ मे रोजी नवीन अर्ज भरावा लागणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागा
राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २० लाख ४३ हजार २५४ जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यात विज्ञान शाखेच्या ८ लाख ५२ हजार २०६ जागा , वाणिज्य शाखेच्या ५ लाख ४० हजार ३१२ जागा, कला शाखेच्या ६ लाख ५० हजार ६८२ जागा आहेत.
सर्वाधिक जागा मुंबई विभागात ४ लाख ६१ हजार ६४०, त्या खालोखाल जागा पुणे विभागात ३ लाख ७५ हजार ४८६, छत्रपती संभाजीनगर विभागात २ लाख ६६ हजार ७५० जागा असल्याची माहिती देण्यात आली आहे.