
डॉ. राणी खेडीकर , अध्यक्ष, बाल कल्याण समिती पुणे
चितन, मनन करून पालक दमले, पण कौमार्य अवस्थेतील बालकांना आवर घालण्यात कमीच पडत आहेत. बालकांची प्रत्येक बाबतीतील curiosity इतक्या टोकाला पोहोचली आहे की त्यापुढे परिणामाचा विचार करण्याची सद्सदविवेक बुद्धी कामचं करत नाहीये. एकमेकांना चॅलेंज देणे आणि ते चॅलेंज जिंकण्यासाठी कुठल्याही पातळीवर जाण्याचे धाडस करणे ही बाब अनेक गंभीर घटनाकडे बालकांना वळवत आहे. याचे चिंतन होणे आणि प्रभावी उपाययोजना शोधणे आवश्यक झालं आहे.
काही मुद्दे परत परत विचारात घेणे महत्त्वाचे आहे. बालकं अशी का वागतात? हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतो आहे. पालक-बालक यांच्यातील दरी ही काही नवीन नाहीये. पालक-बालक यांच्यात वैचारिक द्वंद सुरूच आहे आणि काळानुसार सगळ्या संकल्पना बदलत जाणारचं आहेत. पालकांना ज्या गोष्टी खूप गंभीर वाटतात त्या बालकांना तितक्याशा गंभीर वाटतं नाही. नीतिमत्ता, प्रामाणिकपणा या सगळ्यांचा फारसा प्रभाव आता बालकावर दिसून येत नाही. बालक आपल्या पालकांच्या विचारांशी त्यांनी जपलेल्या नियमांशी तितकेसे जोडलेले पण नाही. ज्यांच्या घरी कधी कोणी डान्स बारमध्ये गेल्याचा इतिहासच नाही किंवा त्याचं नाव देखील घरी काढलं जात नाही अशा घरची एक बालिका आपल्या मित्रासोबत घरी काहीही न सांगता जात असे. तिच्या सोबत तिथे वाईट प्रकार घडला आणि नंतर ती स्वतःच तिकडे कुतूहल म्हणून गेली होती. तिला कोणीही जबरदस्ती तिथे घेऊन गेले नव्हते ही माहिती समोर आली. पण तिथे तिच्या सोबत जे घडले ते तिच्या मर्जीने नव्हते त्यात तिची इच्छा सामील नव्हती हे बालिकेने सांगितले. अर्थात तिथे जाणे हे काही वाईट वगैरे नाही, असे विचार बालिकेने तिच्या मित्र-मैत्रिणींकडून ग्रहण केले होते आणि ते तिला बरोबर वाटले होते. म्हणून ती तिथे गेली इथपर्यंत तिला तिचं काही चुकलं असे नाही वाटले आणि पुढे जे काही झाले ते तिच्या सोबत चुकीचे झालं असं तिचं सांगणं होतं. जे घडलं तो गुन्हा होताच पण हा टाळता आला असता हे पालकांचे विचार होते. यात नेमकं द्वंद काय तर चूक बरोबर या संकल्पनामध्ये होत जाणारा बदल. या बदलामुळे पालक-बालक यांच्यात निर्माण होत जाणारी दरी. ही दरी डोहात रूपांतरित होत जाते आणि पालक बालकांच्या विश्वातून खूप लांब होत जातात. बालक आपल्याभोवती एक कोश निर्माण करतात आणि त्यात पालकांना प्रवेश नसतो.
एक बाळ जन्माला येतं त्या क्षणापासून पालकांकडे अनेक गोड स्मृती असतात बालकांच्या. कालांतराने या स्मृती फक्त पालकांच्या होऊन जातात. बालक त्याच्या वाढत्या वयानुसार ते विसरत जातं. जन्म झाल्यापासून तर सहा ते सात वर्षांपर्यंत बालकांना विशेष काही आठवत नसतं हे शास्त्र सांगतं. त्या काळातील स्मृती फक्त पालकांच्या असतात. पुढे कालांतराने बालकांसाठी त्या त्यांच्या पालकांनी सांगितलेल्या सत्य कथा असतात. स्मृती म्हणून त्यांच्याशी ते जोडलेल्या नसतात. एखाद्या कुटुंबात खूप बिंबवून काही गोष्टी सांगितल्या जातात पण नेमकी तीच रेष बालक ओलांडतात का तर curiosity म्हणून. आता यावर उपाय काय करायला हवे हा प्रश्न शिल्लक उरतोच. पालकांचे बालकाशी कितीही मैत्रीपूर्ण संबंध असले तरी काही गोष्टी तो लपवणारच हे निश्चित आहे. म्हणून आपण पाळलेले आदर्श त्यांनी पाळावेच याचा अती आग्रह न धरता ते पाळले नाही, तर कुठले संभाव्य धोके होऊ शकतात, त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं आणि स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं याची खुली चर्चा व्हायला हवी. चर्चेदरम्यान पालकांनी बालकांना बोलण्याची व्यक्त होण्याची संधी द्यावी. आधीच एखाद्या बाबतीत नकारात्मक विचार पालकांकडून व्यक्त होत असतील, तर बालक त्यावर काहीही बोलणार नाही. म्हणून खुली चर्चा होणं, ती घडवून आणणं आवश्यक आहे. आपल्या बालकाकडून इतरांना गंभीर ईजा होऊ नये आणि त्याला पण काही नुकसान होऊ नये याची माहिती न चिडता, रागावता चर्चेतून बालकापर्यंत पालक पोहोचवू शकले, तर खूप धोके टाळता येतील. इतरांच्या भावनांची जाणं असणं, दुसऱ्याचा त्रास कळणं. हा माणूस असण्याचा पुरावा आहे. ही गोष्ट बालकामध्ये रुजविण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. यासाठी बालकांचे समाजीकरण योग्य मार्गाने व्हायला हवं आहे. प्रत्येक पिढीतील व्यक्तीशी बालकांनी बोलायला हवंय. आज आपण बघतो, बालक केवळ त्यांच्या वयातील बालकांशी जास्त संवाद साधतात किंवा फार तर थोड्या मोठ्या बालकांशी बोलतात. ते ही प्रत्यक्ष कमीच. अनुभवांची कक्षा मोठी असलेली व्यक्ती बालकांच्या संपर्कात असली तरी त्यांच्याशी बोलणं त्यांना फारसं आवडत नाही. कारण ते अनुभव केवळ लेक्चर म्हणून आपल्यापर्यंत येत आहेत याची जाणीव बालकास होते आणि त्याला ते नकोसं वाटतं. म्हणून हे अनुभव खुली चर्चा मोकळं बोलणं फक्त शेअरिंग या अंगाने असेल, तर ते बालकाकडून स्वीकारलं जातं. कदाचित जो धडा घ्यायचा तो त्यांचे ते घेतात, पण जर आपण आग्रह कमी केला तर...