
'मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ...", छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी दिली जाणार असल्याचा अंदाज आहे. जी यापूर्वी धनंजय मुंडे यांकडे होती.
छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम मुंबईतील राजभवनात आज मंगळवार दिनांक २० मे रोजी पार पडला. 'मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ शपथ घेतो की...', असं म्हणत छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महायुतीच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना आधी स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे छगन भुजबळ नाराज होते.
छगन भुजबळांची नाराजी दूर
छगन भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. याबाबतची खंत त्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. अनेकदा भुजबळांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये याच मुद्द्यावरून नाराजीही उघडपणे बोलून दाखवली होती. अजित पवारांनी मंत्रिमंडळात डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्या वेळी फडणवीसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले. पण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पुढे हेच खाते पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द रण्याची दाट शक्यता आहे.
मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ते स्वीकारणार
मंत्रीमंडळ शपथविधी नंतर भुजबळांनी प्रसारमध्यमांशी संवाद साधला. त्यादरम्यान कोणते पदभार स्वीकारणार या प्रश्नांवर उत्तर देताना भुजबळ यांनी मुख्यमंत्री जे खातं देणार ते स्वीकारेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.