
अभय गोखले
बांगलादेशमधील ‘अवामी लीग’ या सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या पक्षाची स्थापना १९४९ साली झाली. गेल्यावर्षी या पक्षाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. या पक्षाने १९५२ साली झालेल्या भाषिक आंदोलनात मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानवर जेव्हा पश्चिम पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी उर्दू भाषेची सक्ती केली तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी अवामी लीगच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक आंदोलक मृत्युमुखी पडले होते.
पूर्व पाकिस्तानातील जनतेला आपली मातृभाषा (बंगाली) अतिशय प्रिय असल्याने, त्यांनी उर्दू भाषेच्या सक्तीला प्राणपणाने विरोध केला होता. पूर्व पाकिस्तान फार काळ पाकिस्तानचा भाग म्हणून राहणार नाही याची प्रचिती १९५२ मधील भाषिक आंदोलनामुळे आली.
भाषिक आंदोलनाचे नेतृत्व अवामी लीगने केल्यानंतर, अवामी लीगच्या पाठीराख्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अवामी लीगला शेख मुजीबर रेहमान यांच्यासारखे समर्थ नेतृत्व लाभल्यामुळे त्यानंतर झालेल्या आंदोलनांचे नेतृत्व अवामी लीगने केले.
१९६९ साली पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बली अवामी लीगला बहुमत मिळाले आणि सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याला निमंत्रण मिळेल अशी आशा बाळगणाऱ्या अवामी लीगची मोठीच निराशा झाली.
पूर्व पाकिस्तानातील नेत्याला पाकिस्तानचे पंतप्रधानपद मिळून द्यायचे नाही या इर्षेने पेटलेल्या याह्या खान आणि भुत्तो यांनी अवामी लीगचे नेते शेख मुजीबर रेहमान यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले नाही.
अवामी लीगच्या नेतृत्वाने, पाकिस्तानी सरकारसमोर काही मागण्या मांडल्या होत्या, त्या मागण्या मान्य न झाल्याने अवामी लीगच्या नेतृत्वाखाली पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे जनआंदोलन उभारण्यात आले. ते आंदोलन पोलिसी बळाच्या सहाय्याने चिरडण्याचा निर्णय याह्या खानने घेतला आणि ऑपरेशन सर्च लाईटच्या मोहिमेअंतर्गत पूर्व पाकिस्तानात नरसंहार घडवून आणला. त्यानंतर अवामी लीग आणि मुक्तिवाहिनीने पाकिस्तानी लष्करासमोर कडवे आव्हान उभे केले. नंतर भारताने या संघर्षात मुक्तिवाहिनीला सर्व प्रकारची मदत केल्यामुळे पाकिस्तानी लष्कराला शरण यावे लागले आणि स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली.
अशा प्रकारे बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अवामी लीग या पक्षावर बांगलादेशातील काळजीवाहू सरकारने बंदी घातल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबर रेहमान यांची १९७५ मध्ये हत्या झाली, ऑगस्ट २०२५ मध्ये त्या घटनेला ५० वर्षं पूर्ण होतील. बांगलादेशमधील सध्याचे काळजीवाहू सरकार कट्टरवाद्यांच्या दबावाखाली येऊन निरनिराळे निर्णय घेत आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबर रेहमान यांना बदनाम करण्याची मोहीम या कट्टरवाद्यांनी चालवली असून, मध्यंतरी त्यांनी शेख मुजिबर रेहमान यांच्या घराची नासधूस केली होती. शेख मुजीबर रेहमान यांचे पुतळे जमीनदोस्त केले होते.
शेख मुजीबर रेहमान यांचा फोटो बांगलादेशच्या करन्सी नोटांवरून हटविण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर बांगलादेशमध्ये नोटांची टंचाई निर्माण झाली असून, नवीन नोटा चलनात येईपर्यंत ही टंचाई कायम राहण्याची शक्यता आहे.
अवामी लीग या पक्षावर बंदी घालण्याची मागणी जमाते इस्लामी, नॅशनल सिटिझन्स पार्टी आणि इतर संघटनांकडून बऱ्याच दिवसांपासून होत होती. त्याकरीता ढाका येथे या संघटनांनी आंदोलन सुरू केले होते. त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. अखेर त्यांच्या पुढे नमते घेऊन सरकारने अवामी लीगवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत अवामी लीगवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेवर बंदी घालण्यात आली होती.
जुलै २०२४ मध्ये आरक्षण विरोधी जे आंदोलन बांगलादेशमधील विद्यार्थी आणि इतर नागरिकांनी पुकारले होते, त्याला हिंसक वळण लागले आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक आंदोलक मृत्युमुखी पडले. त्याबद्दल शेख हसीना आणि अवामी लीग या पक्षाला दोषी ठरवून त्यांच्यावर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत, त्या खटल्यांचा निकाल लागेपर्यंत अवामी लीगवरील बंदी कायम राहणार आहे. सध्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या भारतामध्ये वास्तव्य करत आहेत. त्यांचा ताबा मिळवण्यासाठी बांगलादेशकडून अनेक वेळा मागणी करण्यात आली आहे. अवामी लीगचे अनेक नेते बांगलादेश बाहेर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलेदा झिया या नुकत्याच बांगलादेशमध्ये परतल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने, अवामी लीगवरील बंदीचे स्वागत केले आहे. आरक्षण विरोधी आंदोलनात पुढाकार घेतलेल्या विद्यार्थी नेत्यांनी नॅशनल सिटिझन्स पार्टी या पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाने लवकरात लवकर बांगलादेशमध्ये निवडणुका घेण्याची मागणी लावून धरली आहे. खलेदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनेही निवडणुका लवकरात लवकर घेण्याची मागणी केली आहे. मात्र काळजीवाहू सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी आधी सुधारणा आणि नंतर निवडणुका असा पवित्रा घेतला आहे. त्यावरून सरकार आणि राजकीय पक्ष यांच्यात संघर्ष झाल्यास परिस्थिती चिघळू शकेल आणि लष्कर प्रमुखांना त्यात हस्तक्षेप करावा लागेल.
गेली १५ वर्षे बांगलादेशमध्ये जो पक्ष सत्तेवर होता, त्या पक्षावर (अवामी लीग) बंदी घालण्यात आल्याने, त्याचे विरोधक जरी खूष असले तरी निकोप लोकशाहीसाठी ही गोष्ट चांगली नाही. शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान असताना त्यांनी सर्व लोकशाही मूल्ये धाब्यावर बसवून गैरमार्गाने निवडणुका जिंकल्या होत्या. सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने निवडणुकांवर बहिष्कार घातल्याने त्या निवडणुकांना काही अर्थ उरला नव्हता. आता अवामी लीगवर बंदी घालण्यात आल्याने, जेंव्हा निवडणुका होतील तेव्हा तो पक्ष निवडणूक रिंगणात नसणार. अशा परिस्थितीत त्या निवडणुकांना काय अर्थ असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.