
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
हल्ली सारखे ऐकायला मिळते की, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. लहान मुलांना सुद्धा अॅटॅक येत आहे. का बरं? यावर संशोधन केल्यानंतर सर्वांप्रमाणे एकच ठोकताळा... श्वास घ्यायला होत नव्हता कारण कफ, इतर आजारपण, मानसिक त्रास, चिंता अनेक कारणे समोर आली. याचं कारण आपल्याला माहीत असले तरी पण आपण त्यावर मात करू शकत नाही, कारण आपण आता खूप पुढे गेलो आहोत. जेंव्हा मी खोलवर जाऊन यावर संशोधन केले तेव्हा एकच उत्तर मिळाले वायू प्रदूषण. हे एक अनभिज्ञ सत्य आहे.
पृथ्वीभोवती वातावरणाचे मुख्यत: ५ थर आहेत. O3 ₃ रेणूपासून तयार झालेला पृथ्वीच्या वातावरणातील ‘ओझोन’ हा एक वायू आहे जो पृथ्वीच्या वातावरणातील दुसरा थर असून त्याची निर्मिती नैसर्गिकरीत्या झाली आहे. ज्याची उंची ७.५ ते ३० मैलांपर्यंत आहे. यातील ओझोनचा थर हा सूर्यकिरणातील हानिकारक अतिनील किरणे शोषून घेतो. यामुळे आपल्या पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे रक्षण होते. ओझोनचा उपयोग निर्जंतुकीकरण करणे, जलशुद्धीकरण करणे यासाठी होतो. पृथ्वीच्या वातावरणातील वायूचा एक गट आहे ज्यामध्ये इन्फ्रारेड किरणोत्सर्ग शोषण्याची क्षमता असते. म्हणजेच "हरितगृह वायू". हरितगृह वायू हा वातावरणातील उष्णता अडकवून ठेवतो त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. हा हरितगृह वायू पृथ्वीला उबदार ठेवतो. कार्बनडाय-ऑक्साइड, पाण्याची वाफ, मिथेन, नायट्रोसॉक्साईड यांच मिश्रण म्हणजे हरितगृह वायू.
या पृथ्वीवर अद्भुत शक्तीने नैसर्गिकरीत्या सर्वच सजीव सृष्टीसाठी पूरक अशीच नैसर्गिक संरक्षणात्मक संयोजना केली आहे. सर्व सजीव सृष्टीतील मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या काही योजना आखल्या त्यातून या निसर्गाचा फक्त विध्वंस झाला आहे. त्यातील सर्वात मोठा हा प्रदूषण या मार्गाने होत आहे आणि तो सातत्याने केला जात आहे.
‘वायू प्रदूषण’ म्हणजे द्रव कण, धुळीचे घनकण आणि हानिकारक वायूचे मिश्रण. त्यासाठी अनेक स्त्रोत आहेत. अगदी घरातील देवपूजेपासून ते स्वयंपाक, वीज निर्मिती वाहतुकीकरण, कचरा जाळणे, शेतीमधील विविध कार्य पद्धती, वीज निर्मिती, औद्योगिक चिमण्या, बांधकाम आणि उच्च कोटींचे म्हणजे युद्ध असे अनेक स्त्रोत या वायू प्रदूषणास कारणीभूत आहेत. म्हणजे आपण २४ तास पूर्णपणे घेणारा अमृततुल्य श्वास हा पूर्णपणे विषारी आहे. मानवी क्रियाकलापांमुळे दिवसेंदिवस या प्रदूषणासोबत ओझोनचा थर कमी होत चाललाच आहे. जर याची अतिनील किरणे मानवापर्यंत पोहोचली, तर येथील इतर घटकांचा अंत होणारच; परंतु मानवाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन अनेक रोगांनी ग्रस्त होईल ज्यावर औषधं सुद्धा काम करणार नाहीत आणि शेवट अंत.
मूलभूत मानवी हक्क अनेक आहेत त्यातीलच एक शुद्ध हवा; परंतु आरोग्यासाठी सर्वात मोठा असणारा धोका जो वायू प्रदूषणामुळे निर्माण होतो तो म्हणजे हृदयविकाराचा झटका. आता हृदयविकाराचा झटका हा खूप सहज झाला आहे. त्यातून जगण्याची शाश्वती नाहीच. आत्ताच्या काळात व्यायाम करणाऱ्यांना सुद्धा हृदयाचा झटका येतो त्याचे कारण प्रदूषित हवा. जंगलांपेक्षा शहरात सर्वच प्रकारचे प्रदूषण अति प्रमाणात झाले आहे. विशेषतः कोरोना नंतर झालेल्या प्रदूषणामुळे हार्ट स्ट्रोक हे अति प्रमाणात वाढले आहेत. आपण केलेले चुकीचे प्रकल्प म्हणजे पर्यावरणाला हानिकारक असे असल्यामुळे पूर्ण वातावरणातील कितीही प्रयत्न केला, तरी वायू प्रदूषण जे अति प्रमाणात होत आहे ते आटोक्यात येऊच शकत नाही. कारण आपल्या सुखसोयी या आपण इतक्या गंभीरपणे घेतल्या आहेत की, तिथे आपल्या मृत्यूला किंमत शून्य झाली आहे. ज्याचा आपण विचारच करत नाही. WHO नुसार वायू प्रदूषणाला या शतकातील सर्वात मोठा जागतिक आरोग्य धोका म्हणून ओळखला जातो. कारण या वायू प्रदूषणाच्या संपर्कात आल्यामुळे जगभरात सुमारे अंदाजे ४.५ दशलक्ष अकाली मृत्यू होतात. २.५ मायक्रोमीटरपेक्षाही कमी व्यासाचा प्रदूषक असणारा सूक्ष्म कण रक्त प्रवाहात प्रवेश करू शकतो. ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीत श्वसनरूप आणि कर्करोग होतात. दिवसेंदिवस या विश्वातील प्रत्येक देशात या वायू प्रदूषणामुळे श्वास घेण कठीण होईल, श्वसनाचे अनभिज्ञ असे आजार निर्माण होतील.
वायू तत्त्वाला प्राण का म्हटले जाते? या वायू तत्त्वामुळे शुद्ध हवा जेव्हा प्रत्येक सजीवाच्या शरीरात प्रवेश करते तेंव्हा ती शरीरामधील रक्तप्रवाह शुद्धीकरण करत असते. जेंव्हा रक्त प्रवाह सुरळीत चालतो तेंव्हा आपले हृदय व्यवस्थित कार्य करते. म्हणजेच आपण परत मोकळा श्वास घेतो. हे चक्र प्रत्येक सजीव सृष्टीला जगवते आणि जर ही हवा अशुद्ध असेल, तर रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन लहान मेंदूकडून मोठ्या मेंदूकडे रक्तप्रवाह होऊ शकत नाही शिवाय हृदयापर्यंत सुद्धा रक्त व्यवस्थित पोहोचू शकत नाही. ताजी आणि शुद्ध हवा सर्वच सजीव सृष्टीसाठी एक पोषक तत्त्व आहे ज्यामुळे आपल्या आरोग्याला होणारे फायदे नखशिखांत आहेत.
वृक्ष लागवडीला महत्त्व यासाठी आहे की वनस्पती कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन टाकतात. जो या सजीवसृष्टीसाठी आवश्यक आहे. आत्ताच्या काळात पर्यावरण पूर्णपणे अशुद्ध झाल्यामुळे आपण कितीही प्राणायाम केले तरीही घेणाऱ्या श्वासात विषारी द्रव्य ही शरीरात जातातच. थोडक्यात काय तर या पृथ्वीवरील वायू प्रदूषणामुळे तापमान वाढून अनेक निकृष्ट तत्त्वेही या भूमीत, महासागरात, हवेत मिसळत आहेत. परिणामी सजीव सृष्टीवर होणारे घातक परिणाम. हवा शुद्धीकरणाच्या सरकारकडे अनेक प्रकल्प योजना आहेत; परंतु त्याचबरोबर प्रदूषित करण्याच्या सुद्धा वाटा आहेत. शहरांमध्ये हवा गुणवत्तेसाठी नियोजन आहे; परंतु शहरातील नागरिकांचा सहभाग यासाठी आहे का? या पृथ्वीवरील पर्वत हे प्रदूषण मुक्त करणारे सर्वात मोठे स्त्रोत आहे असे असताना आपण या पर्वताचा आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हानीकारक प्रकल्प योजना करून आपल्याच हाताने आपला मृत्यू ओढवून घेत आहोत की नाही? या पंचतत्त्वांनी परिपूर्ण असणाऱ्या पृथ्वीचा विनाश हा आपण करीत आहोत.