
के. ई. एम रुग्णालयाने सुरुवातीला फेटाळला दावा
देशात आठवड्यात ५८ नव्या कोरोना बाधितांची नोंद
सतर्क राहण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
मुंबई : कोरोनाच्या संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. या दोन्ही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा कोरोना लाटेचा धोका निर्माण झाला आहे. भारतातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केल्याचे म्हटले जात आहे. जगातील काही देशांमध्ये कोविड पुन्हा डोके वर काढू लागला आहे. आशियाई देशांमध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याच्या वृत्ताने पुन्हा एकदा खळबळ माजली असून, आता आरोग्य यंत्रणांनीसुद्धा खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे. उपलब्ध माहितीनुसार कोरोनाचा संसर्ग आता मुंबईतसुद्धा भीतीत भर घालताना दिसत आहे. कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या ८ व्यक्तींना रुग्णालयाने सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.
कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच मुंबईत दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. त्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला नसल्याचे आधी रुग्णालयाने सांगितले. पण त्यानंतर राजकीय घटकांनी रुग्णालयात धाव घेत याबाबत कागदपत्रे दाखवली असता त्यानंतर रुग्णालयाकडून उत्तर देण्यात आले. केईएम रुग्णालयात रविवारी सकाळी ५८ वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाला. १४ मे रोजी महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी एका १३ वर्षीय मुलीचाही मृत्यू झाला. या दोघींनाही कोरोना झालेला होता, असे म्हटले गेले. पण, रुग्णालयाने सुरूवातीला हे फेटाळले.

मुसळधार पावसामुळे वीज पडून एकाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी नाशिक: जिल्हयात सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध शहरात अनेक अपघात ...
राजकीय घटकांनी केईएम रुग्णालय प्रशासनाची भेट घेतली. भेटीवेळी प्रशासनाने दोघींचा मृत्यू कोविडमुळे झाल्याचे अमान्य केले. परंतु याबाबत संबंधितांनी दोन्ही मयत रुग्णांना कोरोना झाला होता, याचे पुरावे दाखवले. त्यानंतर रुग्णालयाने दोघींनाही कोरोना झालेला होता, हे मान्य केले. प्रशासन देखील म्हणत आहे की, दोन रुग्णांचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांची चाचणी करण्यात आली; त्यात ते कोरोनाबाधित होते. त्यांचा मृतदेह घरच्यांना न देता कोरोना मृतांवर जसे अंत्यसंस्कार करतात, तसेच त्यांच्यावरही करण्यात आले. रुग्णालय सुरूवातीला टाळत होते. आम्ही वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली असल्याचा दावा राजकीय घटकांनी केला आहे.
साधारण आठवडाभराची आकडेवारी पाहिल्यास देशात गेल्या आठवड्यात ५८ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता २५७ वर पोहोचली आहे. भारतात कोरोना चाचण्यांची संख्या कमी असतानाही रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. दरम्यान या परिस्थितीमध्ये घाबरण्याऐवजी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.