मुंबई : मुंबईच्या आग्रीपाडा परिसरात जमिनीच्या वादातून जमावाने गोळीबार केला. नंतर लाठ्याकाठ्यांनी एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या प्रकरणात एक जण गंभीर जखमी झाला. गोळीबार प्रकरणी पोलिसांनी ४१ जणांना अटक केली. यात वीस महिला आणि एकवीस पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून चार रायफली, मिरची स्प्रे तसेच हल्ल्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या सर्वांना मुंबईच्या किल्ला कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. सर्व आरोपींना सोमवार १९ मे रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल.
जमिनीच्या वादातून मनी मॅग्नम नेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांवर हल्ला झाला होता. या वेळी जमावाने कंपनीच्या कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी रायफलने गोळीबार केला तसेच दगड आणि विटांचा मारा केला. लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांचाही हल्ल्यासाठी वापर करण्यात आला. या हल्ल्यात मॅग्नम मनी मॅग्नम नेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एक कर्मचारी जखमी झाले आहेत. आग्रीपाडा पोलिसांनी याप्रकरणी फ्रँको इंडिया फार्मास्यु्टिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ४१ जणांना अटक केली आहे.