
मुंबई इंडियन्सचे अजून दोन साखळी सामने व्हायचे आहेत. यापैकी एक सामना २१ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आणि दुसरा सामना २६ मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होणार आहे. मुंबईला दिल्ली आणि पंजाब या दोन संघांविरुद्ध प्रत्येकी एक साखळी सामना खेळायचा आहे. हे दोन्ही सामने जिंकले तर मुंबई इंडियन्सची टीम आरामात पुढील फेरीसाठी चौथा संघ म्हणून पात्र होणार आहे. पण यातील एखादा सामना मुंबईने गमावल्यास जर - तरच्या गणिताला सुरुवात होणार आहे.
तिन्ही सामने जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी लखनऊ संघाला आशा करावी लागेल की दिल्ली आणि मुंबई 16 किंवा त्याहून अधिक गुणांपर्यंत पोहोचणार नाहीत. दिल्लीचा मुंबईने पराभव केला तर दिल्ली स्पर्धेतून बाहेर पडेल. जर दिल्ली जिंकली तर मुंबईला पंजाबविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल आणि दिल्लीने त्यांचा शेवटचा लीग सामना पंजाबविरुद्ध गमवावा अशी आशा करावी लागेल.
गुजरात टायटन्सने २२ मे रोजी लखनऊ आणि २५ मे रोजी चेन्नईविरुद्धचे उर्वरित दोन सामने जिंकल्यास ते टॉप टू मध्ये कायम राहतील आणि २९ मे रोजी होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळतील. जर गुजरातने एक सामना गमावला तसेच पंजाब किंवा आरसीबीने त्यांच्या उर्वरित साखळी सामन्यांपैकी एक सामना गमावला, तरीही गुजरात अव्वल दोनमध्ये राहील. पण इतर संघांचे निकालही गुजरातच्या टॉप टू मध्ये असण्यावर परिणाम करतील.