वॉशिंगटन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कॅन्सरने ग्रासलं आहे. बायडन यांना प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर झाल्यानं त्यांची प्रकृती ढासाळत चालली आहे. (Former US President Joe Biden has prostate cancer) रविवारी (दि.१७) बायडन यांच्या कार्यलयाकडून याबाबत माहिती देण्यात आली.
बायडन यांच्या कार्यालयानं सांगितलं की, प्रोस्टेट कर्करोग त्यांच्या हाडांपर्यंत पसरला आहे. यामुळे त्यांच्यावर कॅन्सरची ट्रिटमेंट सुरु केली जाणार आहे. बायडन यांना लागण झालेला विकार हा काहीसा आक्रमक स्वरुपाचा आहे. पण कॅन्सरचे हार्मोन्स संवेदनशील असल्याने ते नियंत्रित होऊ शकतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे ८२ वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना लघवीचा त्रास होता. यासाठी शुक्रवारी बायडन यांची जेव्हा डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा त्यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, जो बायडेन आणि त्यांचे कुटुंब डॉक्टरांशी उपचार पर्यायांवर चर्चा करत आहेत. बायडेन यांना झालेला हा आजार अधिक आक्रमक आहे. त्यामुळे त्यावर वेळीच योग्य उपचार होणे आवश्यक आहे.जो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्या आजारपणाच्या वृत्ताने समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.जो बायडन यांच्या मुलाचा कर्करोगाने मृत्यू
२०१५ साली बायडेन यांचा मोठा मुलगा ब्यू बायडेन याचा कर्करोगानेच मृत्यू झाला होता. त्याला ग्लायोब्लास्टोमा नावाच्या मेंदूच्या अत्यंत धोकादायक कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर आता जो बायडन यांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. बायडेन कुटुंबीय पुढील उपचारासाठी कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.
बायडेन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली प्रार्थना
बायडन यांना कॅन्सरची लागण झाल्याची बातमी कळताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, मेलानिया आणि जो बायडन यांच्या नुकत्याच समोर आलेल्या वैद्यकीय स्थितीबद्दल ऐकून दुःख वाटलं. जिल कुटुंबांसोबत (बायडन यांची पत्नी) आमच्या सद्भावना आहेत. आम्ही बायडन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी आशा करतो.जो बायडेन हे ८२ वर्षांचे असून २०२१ ते २०२४ या कालावधीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
जो बायडन यांच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली काळजी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील बायडेन यांच्या आजाराबद्दल ट्विट करत काळजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, "जो बायडेन यांच्या प्रकृतीबद्दल ऐकून खूप काळजी वाटली. त्यांनी लवकर आणि पूर्ण बरे व्हावे माझ्या सदिच्छा. या संघर्षाच्या काळात आम्ही सर्वजण डॉ. जिल बायडेन आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत,"राष्ट्राध्यक्षपदाच्या शेवटच्या कार्यकाळात त्यांच्यावर सातत्याने वय आणि प्रकृती यावरून विरोधक टीका करत होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तीन महिन्यापूर्वी त्यांनी माघार घेतली आणि त्यांच्याजागी कमला हॅरिस यांचा उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अमेरिकेच्या जनतेने बायडेन यांना नाकारले आणि ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.






