
मुंबई: दहिसर पश्चिमेतील गणपत पाटील नगर झोपडपट्टीत रविवारी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाली. या हाणामारी मध्ये कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला या मध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, राम गुप्ता (५०) यांच्या नारळ विक्रीच्या स्टॉलजवळ हमीद शेख (४९) मद्यधुंद अवस्थेत आले आणि किरकोळ वाद झाला. वाद लवकरच हिंसक वळणावर गेला आणि दोन्ही कुटुंबांचे सदस्य एकमेकांवर तुटून पडले. या वादात राम गुप्ता, त्यांचा मुलगा अरविंद गुप्ता (२३) आणि हमीद शेख गंभीर जखमी झाले. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या वादात अमर गुप्ता, अमित गुप्ता, अरमान शेख आणि हसन शेख हे चार जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमएचबी पोलिसांनी परस्परविरोधी खुनाचे गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुप्ता आणि शेख कुटुंबांमध्ये मागील दोन वर्षांपासून वाद सुरू होता. जुन्या वैरातूनच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.