
थरुर भाजपात जाणार ? काँग्रेसला का वाटते भीती ?
पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला. त्यामुळे पाकिस्तान खवळला. याच ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आलं, मात्र यात काँग्रेस नेते शशी थरूर यांचं नाव आलं आणि वादाची ठिणगी पडली. नेमका काय झाला वाद ते जाणून घेऊयात...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारताने सूड उगवला. ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली. त्यामुळे खवळलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले, मात्र तेही भारताने धुळीस मिळवले. त्याच वेळी मोदी सरकारने भारत दहशतवादाविरोधात लढत आहे आणि त्यासाठीच ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली हे स्पष्ट केलं. याच ऑपरेशन सिंदूर मोहिमनंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. विविध पक्षांचे खासदार आणि माजी मंत्री आणि ८ माजी राजदूतांसह एकूण ५९ राजकीय नेत्यांचा सहभाग असलेली अशी सात राजकीय शिष्टमंडळं तयार करण्यात आली आहेत. शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनाही भेट देणार आहे. राजकारण आणि मतभेदांच्या पलीकडे जाऊन देशाने एकता दर्शवण्याची हीच वेळ असल्याचे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलंय. प्रत्येक शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांना भेट देणार आहे आणि भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका समजावून सांगणार आहेत.
सात शिष्टमंडळांचे सात नेते कोण कोणत्या देशाशी संवाद साधणार आहेत ते पाहूयात :
भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वातील राजकीय शिष्ठमंडळ सौदी अरेबिया, कुवेत, बहरिन, अल्जेरिया या देशांच्या सरकारशी संवाद साधणार आहे आणि त्यांना भारताची भूमिका सांगणार आहे.
भाजपचेच खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वातील राजकीय शिष्ठमंडळ इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्क, युरोपियन युनियन या देशांच्या सरकारशी संवाद साधणार आहे आणि त्यांना भारताची भूमिका सांगणार आहे तसेच युरोपियन युनियनशी संवाद साधणार आहे.
जनता दल युनायटेडच्या संजय कुमार झा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, प्रजासत्ताक कोरिया, जपान, सिंगापूरच्या सरकारशी संवाद साधणार आहे.
शिवसेनेचे डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ यूएई, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओनीच्या सरकारशी संवाद साधणार आहे.
द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लॅटविया आणि रशियाच्या सरकारशी संवाद साधणार आहे.
काँग्रेसचे शशी थरुर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ अमेरिका, पनामा, गुयाना, ब्राझिल, कोलंबियाच्या सरकारशी संवाद साधणार आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इजिप्त, कतार, इथिओपिया, दक्षिण आफ्रिकेच्या सरकारशी संवाद साधणार आहे.
शिष्टमंडळाच्या या यादीमध्ये काँग्रेस खासदार शशी थरुर यांचं नाव आलं आणि काँग्रेस संतापली. शशी थरुर यांचं नाव सुचवलेलं नसतानाही सरकारने प्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव घेतलं, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय. काँग्रेसने आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार यांची नावं दिली होती. मात्र केंद्र सरकारने अचानक शशी थरूर यांची निवड का केली, हा प्रश्न उपस्थित झालाय.

मुंबईत २६ जुलै २००५ ची अतिवृष्टीची रात्र आठवली की काळजाचा ठोका चुकतो. या दिवशी प्रचंड पाऊस झाल्यानं मुंबई शहर पाण्याखाली गेलं होतं. मुंबईत या आधी आणि ...
शशी थरुर यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये विविध पदांवर काम केलंय. जागतिक व्यासपीठावर भक्कमपणे बाजू मांडण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाणही शशी थरूर यांना आहे. भारताची भूमिका उत्तमरीत्या मांडण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यातच शशी थरूर यांची निवड होण्यामागे अजून एका कारणाची चर्चा रंगलीय. जर माझ्या सेवांची आवश्यकता नसेल तर माझ्याकडे भरपूर पर्याय आहेत असं एका मल्याळम कार्यक्रमात शशी थरूर बोलले होते. थरूर यांच्या या विधानामुळेच ते काँग्रेस सोडू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली. त्यातच थरूर यांनी लढाऊ विमानांच्या कराराबाबत केंद्र सरकारचं तोंड भरून कौतुकही केलं होतं. तसंच केरळमधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ही खेळी केलीय आणि शशी थरूर यांच्या रुपात एक चांगला तसंच मोठा चेहरा भाजपला मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगलीय.
भारताला ऑपरेशन सिंदूरचं महत्त्व जगाला पटवून द्यायचं आहे. दुसरीकडे शशी थरूर यांचं नाव शिष्टमंडळात समाविष्ट केल्याने काँग्रेसने भाजपावर आक्षेप घेतलाय. पक्षाशी सल्लामसलत केल्याशिवाय सरकार शिष्टमंडळात खासदारांची नाव समाविष्ट करू शकत नाही अशी भूमिका काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी घेतलीय. शशी थरुर यांचा संयुक्त राष्ट्रांत काम करण्याचा अनुभव आणि परराष्ट्र धोरणांबाबत सखोल ज्ञान कोणीही नाकारू शकत नाही. मग काँग्रेसने शिष्टमंडळांसाठी थरूर यांच्या नवाची शिफारस का केली नाही, असा सवाल भाजपाने उपस्थित केलाय.
असो, शशी थरूर यांच्या नावावरून वादाची ठिणगी पडली असली तरी भारतात दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे देश या सर्वांच्या विरोधात कारवाई करण्याची ठाम भूमिका केंद्र सरकारने घेतलीय.आणि त्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन केलंय, यात काँग्रेसने वाद का घालावा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.