Monday, May 19, 2025

देशमहत्वाची बातमी

खेळता खेळता कारमध्ये बसली मुले आणि अचानक लॉक झाला दरवाजा, जीव गुदमरून ४ चिमुकल्यांचा मृत्यू

खेळता खेळता कारमध्ये बसली मुले आणि अचानक लॉक झाला दरवाजा, जीव गुदमरून ४ चिमुकल्यांचा मृत्यू

अमरावती: आंध्र प्रदेशच्या ईस्ट गोदावरील जिल्ह्याच्या द्वारापुडी गावात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथे कारमध्ये खेळताना दरवाजा लॉक झाल्याने ४ चिमुकल्यांचा जीव गुदमरून मृत्यू झाला आहे. ही घटना गावातील महिला मंडळाच्या कार्यालयाजवळ घडली. यावेळी ही मुले येथील एका कारमध्ये बसून खेळत होती.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलांचे वय ६ ते ८ वर्षे इतके होते. ते एका कौटुंबिक लग्न सोहळ्यात सामील होण्यासाठी आले होते. यादरम्यान मुले खेळत होती आणि खेळता खेळता ती कारमध्ये जाऊन बसली. चुकून गाडीचा दरवाजा लॉक झाला. बाहेर याचा कोणाला अंदाजच नव्हता. मात्र जेव्हा समजले तेव्हा खूप उशीर झाला होता.


एमएसएमई मंत्री कोण्डापल्ली श्रीनिवास यांनी या घटनेप्रकरणी दु:ख व्यक्त करताना म्हटले, लग्न समारंभात सामील होण्यासाठी आलेले कुटुंबातील ही मुले खेळत होती. त्यावेळी एका बेवारस कारमध्ये ही मुले घुसली. मात्र दरवाजा आतून लॉक झाला. बऱ्याच वेळानंतर कुटुंबियांना या घटनेबाबत समजले मात्र तोपर्यंत चारही मुला-मुलींचा मृत्यू झाला होता.


या घटनेने त्या चिमुकल्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाचे हसते खेळते वातावरण या घटनेने पूर्ण बदलून गेले आहे. संपूर्ण कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
Comments
Add Comment