
हरियाणाच्या नूहमध्ये पाकिस्तानी 'गुप्तचर' नेटवर्कचा पर्दाफाश, दोन दिवसांत दुसरी अटक
चंदीगड: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात हरियाणातील हिसारमधून युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक केल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या कारवाईत आणखी काही लोकांच देखील चौकशी केली जात आहे. ज्यामध्ये हरियाणाच्या नूह जिल्ह्यातून दोन संशयित हेरांना अटक केली आहे. त्यामध्ये मोहम्मद तारिफ या नावाचा मुख्य गुप्तहेर असून, त्याने पाकिस्तानच्या गुप्तचर नेटवर्कसाठी काम केल्याची कबुली दिली आहे.
तारिफ, नूह जिल्ह्यातील तावाडू येथील कांगारका गावचा रहिवासी असून, सुरुवातीला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना सिम कार्ड पुरवण्याचे काम करत होता. पुढे त्याच अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, त्याने भारतीय लष्करी ठिकाणांबाबत संवेदनशील माहिती पुरवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठवली, आणि नंतर ती तंत्रज्ञान वापरून डिलीटही केली गेली.
तारिफच्या जबाबानुसार, त्याचा पहिला संपर्क पाकिस्तानच्या दिल्लीतील दूतावासातील अधिकारी आसिफ बलोचशी झाला होता. बलोचच्या माध्यमातून त्याने पाकिस्तानातही प्रवास केला. परत आल्यावर त्याला अशा लोकांना पाकिस्तानात पाठवण्याची जबाबदारी देण्यात आली, ज्यांना पाकिस्तानी व्हिसाची गरज होती. यासाठी त्याला पैसे देखील दिले जात होते. २०२४ मध्ये आसिफ बलोचची बदली झाल्यानंतर तारिफचा संपर्क दुसरा पाकिस्तानी अधिकारी जाफरशी झाला. जाफरने तारिफला सिरसा येथील हवाई दल तळावर नजर ठेवण्याचे आणि तिथली गोपनीय माहिती मिळवण्याचे काम दिले. गेल्या दीड वर्षांपासून तारिफने मोठ्या प्रमाणात माहिती पाकिस्तानला पाठवली असल्याचे पोलीस तपासांत स्पष्ट झाले आहे.
तारिफचा विवाह दिल्लीतील चंदनहोला येथे झाला होता आणि त्याला दोन मुलं देखील आहेत. या परिसरात तो एक ढोंगी डॉक्टर म्हणूनही ओळखला जात होता. अंसल फार्म हाऊसजवळ त्याने एक छोटंसं क्लिनिक उघडलं होतं, ज्याचा वापर केवळ सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी केला जात होता. आता हरियाणा पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी सुरू केली असून, पाकिस्तानशी संबंधित हेरगिरीच्या नेटवर्कचा तपास वाढवण्यात आला आहे.