
पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसल्याबद्दल त्यांना अद्दल घडवण्यासाठी मोदींनी पाकविरुद्ध जोरदार युद्धसदृष्य हालचाली केल्या आणि शंभर दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मुरीदके, बहावलपूर आदी ठिकाणच्या दहशतवादी अड्ड्यांवर लष्कराने जोरदार हल्ले चढवून दहशतवाद्यांना ठार केले. त्यातच कंदाहार येथील विमान अपहरण प्रकरणात हवा असलेला दहशतवादी अझर मसूद याचे कुटुंबीय मुरीदके येथील हल्ल्यात ठार झाले. लष्कराच्या हल्ल्यात पाकचे दहशतवादी आणि पाकचे सैनिकही ठार झाले आणि पाकला चांगलाच धडा शिकवला गेला. पाकने शरणागती पत्करली आणि पाक दाती तृण धरून शरण आला. पण मोदी यांनी आता पाकला राजनैतिक पातळीवरही नामोहरम करण्याचे धोरण स्वीकारले आहे आणि त्यांनी हा राजनैतिक सर्जिकल स्ट्राईक अत्यंत जोरदार केला आहे.
पाकचे प्रथम पाणी बंद केले, नंतर पाकला जाणारी निर्यात थांबवली आणि आता तर तुर्कस्थानला धडा शिकवला आहे कारण त्याने पाकला मदत केली याचे प्रायश्चित्त त्याला देण्यात आले आहे. त्याच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडून आणि त्याच्याशी असलेले आर्थिक संबंध तोडून पण पाकसाठी हे पुरेसे नाही, कारण पाक कधीही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला काही करू शकत नसला तरीही भारताला त्रास देत रहाणार हे ओळखून मोदी यांनी आता हा राजनैतिक ऑफेन्सिव्ह म्हणजे पाकचे सर्वकंष पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोदी यांचा मास्टर स्ट्रोक आहे. या सीझफायरमध्ये भारत ड्रोन्स किंवा क्षेपणास्त्रे डागणार नाही, तर पाकला पुरता एक्सपोझ करणार आहे. भारत आता सात उच्च शक्तीशाली पक्षांची शिष्टमंडळे जगातील विविध प्रमुख देशांना पाठवणार आहे आणि त्यांना हे पटवून देणार आहे की भारत हाच पाक पुरस्कृत दहशतवादाचा शिकार झालेला देश आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व चार एनडीएचे खासदार आणि तीन विरोधी पक्षांचे खासदार करणार आहेत. हे शिष्टमंडळ जगातील प्रमुख आंतरराष्ट्रीय राजधान्यांमध्ये जाऊन सीमावर्ती दहशतवादाविरोधात प्रबळ सहमती तयार करण्याचा प्रयत्न करेल. या डावपेचात्मक चालीमागे भारताची राष्ट्रीय ऐक्य जगासमोर एकसंधपणे आणण्याचा हेतू तर आहेच पण असा एक संदेश जगभर देण्याचा प्रयत्न आहे की, भारत यापुढे कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही आणि जागतिक नेत्यांनी याची दखल घ्यावी. यामुळे जागतिक नेते भारताच्या या कृत्याची दखल घेऊन पाकविरोधात ही भारताची पुढील कृती विचारात घेतील आणि पाकच्या कोणत्याही दुस्साहसाला पाठिंबा देणार नाहीत.
सर्व पक्षीय शिष्टमंडळ भारताची राष्ट्रीय सहमती आणि दहशतवादाला कोणत्याही स्वरूपात मुकाबला करण्याचे भारताचे धोरण जगासमोर आणतील. दहशतवाद कोणत्याही स्वरूपातील आणि आविष्कारातील हा भारतासाठी अस्वीकारार्ह आहे हे पटवण्याचा हे नेते करतील. देशाचा जो संदेश आहे की, कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही हा संदेश जगाला देतील. दुसरे म्हणजे देशांतर्गत लोकांना भारताच्या या कृतीत सर्व पक्ष सहभागी आहेत हा एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा आहे. हा अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे. कारण विरोधी पक्षांकडून सरकारवर जी संभाव्य टीका होणार आहे ती आपोआपच खाली बसेल आणि सरकारविरोधात आक्षेप घेणाऱ्यांना परस्परच उत्तर मिळेल. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीयांची सूडाची इच्छा काही अंशी पूर्ण झाली आहे पण भारतातील काही ‘आस्तिनके साप’ आहेत त्यांची वळवळ या निमित्ताने समोर आली होती. ती आता थंड होणार आहे. त्यातल्या त्यात अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असा जो आरोप मोदी सरकारवर केला जातो तो धुऊन काढण्याचा सरकारचा निर्धार आहे आणि तो या कृतीने बराचसा साध्य होणार आहे. या पूर्वीही भारताने असाच प्रयोग केला होता आणि भारतातील राजकीय पक्ष संकटाच्या समयी एक होतात असा जो संदेश गेला होता त्याला पुष्टी मिळाली आहे.
या आधी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी जिनिव्हाला पाठवण्यासाठी शिष्टमंडळाच्या नेतेपदी तत्कालीन विरोधी पक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी यांची निवड केली होती. पाकने आणलेल्या ठरावावर भारताची भूमिका प्रबळपणे मांडण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघात भारताची भूमिका अधिक प्रबळ करण्यासाठी १९९४ मध्ये हे शिष्टमंडळ जिनिव्हाला गेले होते. या शिष्टमंडळात तेव्हाचे काश्मीरचे मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला याचे वडील, सलमान खुर्शिद आणि मनमोहन सिंग तसेच ई अहमद यांचा समावेश केला होता. तोच संदेश मोदी सरकारने देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यामुळे या शिष्टमंडळात शशी थरूर, रवीशंकर प्रसाद, संजय कुमार झा, वैजयंत पांडा, कनिमोझ, सुप्रिया सुळे आदींचा समावेश करणार आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी कॉंग्रेसचे शशी थरूर यांची निवड झाली आणि त्यामुळे राहुल गांधी याचा पोटशूळ उठला.
कारण काँग्रेसने मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध केला पाहिजे असे त्यांचे धोरण आहे, पण राहुल यांचे हे धोरण थरूर असोत की काँग्रेसला फारसे पसंत नाही, त्यामुळे थरूर हे शिष्टमंडळात सामील झाले आणि त्यांनी नेतृत्व करण्याचे मान्य केले आहे. पण ते असो. अशा संकट समयी तरी आपसतील मतभेद समोर आणू नयेत असे शिष्टाचार सांगतो. पण काँग्रेस आणि त्यापेक्षाही पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या राहुल यांना ते मान्य नाही. पण किरण रिजिजू म्हणाले ते या क्षणी महत्वाचे आहे. ते म्हणजे संकट समयी आम्ही एकजूट आहोत आणि हे जगाला दाखवण्याची हीच अत्यंत योग्य वेळ आहे. दहशतवादाबद्द्दल शून्य सहिष्णुता असा संदेश घेऊन हे शिष्टमंडळ महत्त्वाच्या ठिकाणी फिरणार आहे आणि ही बाब सर्वात महत्त्वाची आहे. प्रमुख भागीदार राष्ट्रांना भेट आणि भारताच्या राष्ट्रीय एक्याचे प्रतिबिंब मतभेदांच्या पलीकडे जाऊन आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे. अशा अवघड समयी भारत एकजूट आहे हे जगाला दाखवणे जास्त महत्त्वाचे आहे.