घाव सोसावेच लागतात...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर


फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एका गावात एक तरुण मूर्तिकार राहत होता. दगड तासून कोरून सुंदर सुंदर मूर्त्या बनवायचा आणि विकायचा. अशा मूर्त्या बनवण्यासाठी योग्य प्रकारच्या दगडाच्या तो नेहमी शोधात असायचा. एकदा कुठंतरी प्रवास करीत असता त्याला रस्त्याच्या कडेला पडलेले दोन भलेमोठे दगड दिसले. त्याने ते दोन्ही दगड गाडीत घालून घरी आणले. धूऊन घासून पुसून स्वच्छ केले आणि एक दगड घेऊन त्यावर छिन्नी टेकवली आणि हातोड्याने हळूहळू घाव घालायला सुरुवात केली. दोन-चार घाव घातले न घातले तोच त्या दगडातून आवाज आला, ‘थांब... खूप दुखतंय. खूप वेदना होताहेत.’घाव घालणारे मूर्तिकाराचे हात थबकले. ‘अरे पण घाव घातल्याशिवाय तुझ्यातून मूर्ती कशी बनवणार मी?’ मूर्तिकाराने दगडाला विचारलं.


‘नको बनवूस. मला नाही मूर्ती बनायचं. तू माझ्यावर घाव घालू नकोस. मला सहन होत नाहीये. मी आहे तसा ठीक आहे.’ दगडाने स्पष्टपणे मूर्तिकाराला आदेश दिला.
‘ठीक आहे.’ मूर्तिकाराने तो दगड बाजूला ठेवला आणि दुसरा दगड उचलला. त्यावर काम करायला सुरुवात केली.’
‘आई गं...’ त्या दगडातूनही आवाज आला.
‘फार दुखतंय का रे?’ मूर्तिकाराने विचारले.
‘दुखतंय खरं. पण तू तुझं काम थांबवू नकोस.’ दगडाने परवानगी दिली. मूर्तिकार आनंदला. एका वेगळ्याच उत्साहाने कामाला लागला. एका वेगळ्याच तंद्रीत त्याने गुणगुणायला सुरुवात केली.
‘भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना...’
मूर्तिकाराच्या मनातील अंतःचक्षूंसमोर मारुतीरायांची मूर्ती उभी राहिली होती आणि हातातल्या छिन्नी हातोड्यांनी दगड कोरला जात होता.


आठ-दहा दिवस अक्षरशः तहान भूक विसरून तो मूर्तिकार दगड कोरत होता. दगडावर छिन्नी हातोड्याने घाव घालत होता. एक एक कपची उडवत होता. त्यावेळी दगड देखील वेदनेने विव्हळत होता. ते घाव सहन करत होता आणि... आणि हळूहळू त्या दगडातून एक मूर्ती स्पष्टपणे आकाराला येऊ लागली. साधीसूधी मूर्ती नव्हे, तर पंचमुखी हनुमानाची मूर्ती. पुढची बाजू पूर्ण झाल्यानंतर मूर्तिकार दगडाच्या मागच्या बाजूला वळला. छिन्नी हातोड्यानं पाठीमागचा भाग कोरायला सुरुवात केली आणि... ती मूर्ती संपूर्ण आकाराला आली. दगडातून साक्षात पंचमुखी हनुमंत प्रकट झाला.


मूर्तिकार शांत झाला. आपल्याच हातून घडलेल्या कलाकृतीकडे अचंब्यानं पाहू लागला. डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. सजीव वाटावी एवढी जीवंत मूर्ती त्या मूर्तिकाराच्या हातून
घडली होती. त्याच दिवशी संध्याकाळी कुणी एक श्रीमंत माणूस त्या मूर्तीकाराकडे आला. त्याने ती मूर्ती पाहिली आणि तो त्या मूर्तीच्या प्रेमातच पडला.
मूर्तिकाराला त्या मूर्तीची किंमत विचारली. मूर्तिकाराने सांगितलेली किंमत घासाघीस न करता देऊन मूर्ती विकत घेतली. मूर्ती गाडीत घालून नेताना सावकाराची नजर त्या दुसऱ्या दगडावर गेली. त्याने मूर्तिकाराला विचारलं. ‘या दगडाचं काय करणार आहेस?’
‘काही नाही. तो असाच पडून राहणार आहे. त्यातून मूर्ती बनवता येणार नाही.’
‘ओह. मग मी तो घेऊन जातो.’
‘खुश्शाल न्या. पण त्या दगडाचं तुम्ही काय करणार आहात?’ मूर्तिकारानं आश्चर्यानं विचारलं.
‘आम्ही मुळचे राजस्थानचे. आमच्या घराण्यात हनुमंताची उपासनेची परंपरा आहे. आमच्या गावी अशीच मूर्ती आहे. इथे पुण्याजवळ मी एक कारखाना उभारतोय. कारखान्याजवळ एक हनुमंताचं मंदिर बांधायची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी ही मूर्ती नेतोय आणि हनुमंताच्या मूर्तीसमोर लोक नारळ फोडतात. हा दुसरा दगड त्यासाठी उपयोगी पडेल की.’ सावकार हसत हसत म्हणाला.


या घटनेला अनेक वर्षे लोटली. पंचमुखी हनुमानाची ती मूर्ती आजही मोठ्या दिमाखाने मंदिरात विराजमान आहे. एक जागृत देवस्थान म्हणून दररोज हजारो लोक दर्शनाला येतात. मंगळवार आणि शनिवारी तर भाविकांची मोठीच गर्दी उसळते. त्या मूर्तीची दररोज पूजा केली जाते. तिला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटला जातो. ‘जय हनुमान ग्यान गुण सागर जय कपिंस तिहू लोक उजागर’ असे म्हणून हनुमान चालिसाचा पाठ वाचला जातो. नगारा घंटेच्या नादात आरती केली जाते. मूर्तीच्या गळ्यात फुलांचे हार घातले जातात.
‘बजरंग बली की... जय’ असा जयघोष केला जातो.


आणि... भाविकांनी आणलेले नारळ मूर्तीसमोर ठेवलेल्या ‘त्या’ दगडावर आपटून फोडले जातात. दर पाच दहा मिनिटांनी फटाका फुटावा तसा आवाज येतो आणि नवीन नारळ दगडावर आदळतो.


अनेक वर्षांपूर्वी मूर्तिकाराकडून छिन्नी हातोड्याचे घाव नाकारणारा दगड आज वर्षानुवर्षं फुटणाऱ्या नारळाचे घाव सहन करतोय. प्रत्येकवेळी फुटलेल्या नारळाच्या पाण्यासोबत त्या दगडाच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू कुणालाच दिसत नाहीत. आपल्या नशिबाला बोल लावत तो दगड त्या मूर्तीसमोर पडून राहिलाय.
जरा आपल्या आजूबाजूला नजर टाकून आपण पाहिलं, तर योग्य वेळी योग्य वयात छिन्नी हातोड्याचे घाव सोसून मूर्ती बनलेले काही लोक आपल्याला आढळतील. अपार कष्ट उपसून, दिवसरात्र मेहनत करून यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या व्यक्तींची नावं डोळ्यांसमोर आणा.


गाणं शिकण्यासाठी वाटेल ते श्रम करणारे पंडीत भीमसेन जोशी, पंडित जसराज, गानतपस्विनी किशोरी आमोणकर त्याचबरोबर अगदी अलीकडच्या काळातले प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर यांसारखे कलाकार क्रिकेट हा एकमेव श्वास आणि ध्यास मानून दररोज मैदानावर सराव करणारे सचिन तेंडुलकर, विराट कोहली, विरेंद्र सहेवाग, महिंद्रसिंग धोनी...


सिनेमा जगात आपला खास ठसा उमटवणारे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आमिर खान, नवाजुद्दीन सिद्दिकी, मनोज बाजपेयी, नाना पाटेकर, परेश रावल यांच्यासारखे चतुरस्त्र अभिनेते. ज्यांनी छिन्नी हातोड्यांचे घाव सहन करून आयुष्याची मूर्ती बनवली अशी अनेक नावे सांगता येतील. आपण त्यांना डोक्यावर घेतो. त्यांचे कौतुक करतो. गुणगान करतो. पण त्याच बरोबर छिन्नी हातोड्याला घाबरून आयुष्यभर दगडच राहिलेले आणि पुढे केवळ नशिबाला बोल लावून मूकपणे रडणारे जिवंत दगडही आपल्याला दिसतील. किंबहुना अशा दगडांची संख्या खूपच मोठी असल्याचं आढळेल. आयुष्यात विशेष काही करण्यास असमर्थ ठरलेले हे दगड आपल्या प्रतिकूल परिस्थितीला आणि नशिबाला बोल लावतात. पण खरा प्रकार मात्र वेगळाच असतो.


त्यांची मूर्ती बनली नाही कारण मूर्ती बनण्याची क्षमता असूनही योग्य वेळी, योग्य वयामध्ये त्यांनी घाव सहन करायला नकार दिलेला असतो.
काहितरी भव्य मिळवण्यासाठी अनेक दिव्यांतून जावे लागते. झळाळण्यापूर्वी सोन्याला मुशीतून तापवले जाते. लखलखण्यापूर्वी हिऱ्याला पैलू पाडले जातात. वृक्ष होण्यासाठी बीजाला दगड धोंड्यांतून प्रवास करावा लागतो. ऊन-वारा पाऊस यांचा मारा सहन करावा लागतो. गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेबाहेर उड्डाण करण्यासाठी रॉकेटला खालच्या बाजूला आग लावून घ्यावी लागते. उसातून मधुर रस निर्माण होण्यासाठी त्याला चरकातून पिळून निघावे लागते. काहीतरी चांगले घडण्यासाठी श्रम करावेच लागतात, घाव सोसावेच लागतात. मेहनत करावीच लागते. हा जगाचा नियमच आहे.


आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे जरा पाहा. तुम्हाला अनेकजण असे आढळतील की ज्यांच्या दिवसाचा बराचसा वेळ काही खास काम न करता केवळ निष्क्रियतेत व्यतित होतो. त्यांना कोणताही अभ्यास करायचा कंटाळा येतो... एखादी कला शिकायचा कंटाळा येतो... एखाद्या खेळामध्ये प्राविण्य मिळवायचा कंटाळा येतो. वाचायचा कंटाळा येतो, लिहायचा कंटाळा येतो, कष्ट करायचा कंटाळा येतो असा प्रत्येक चांगल्या गोष्टींचा कंटाळा करणाऱ्या तरुण तरुणींना व्हॉटसअ‍ॅपवर टाईमपास करायचा मात्र कंटाळा येत नाही. त्यांना इन्स्टाग्रामवर चॅटिंग करायचा मात्र कंटाळा येत नाही. सेल्फी काढून फेसबुकवर लाईक मिळवायचा मात्र कंटाळा येत नाही. नेटवर सर्फिंग करायचा कंटाळा येत नाही. यू ट्यूबवर अनावश्यक व्हीडिओ पाहण्याचा कंटाळा येत नाही. टीव्हीवरच्या रटाळ सिरिअल बघण्याचा कंटाळा येत नाही. एकाच जागेवर काहीही न करता तासनतास बसून मोबाइलवर गप्पा मारण्याचा कंटाळा येत नाही. बसल्या जागी पेंगण्याचा कंटाळा येत नाही.
कंटाळा येतो फक्त अभ्यासाचा, कामाचा, मेहनतीचा...


अशी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला आढळतील. अंगात रग असेपर्यंत आणि परिस्थितीचे चटके जाणवेपर्यंत त्यांना आपण कुठं चुकतोय याची जाणीव देखील होत नाही. पण... विद्यार्थीदशेत किंवा तरुण वयामध्ये योग्य ते कष्ट न करता दिवस दिवस आळस घालवणाऱ्या अनेकांचे पुढे केवळ दगडच राहतात. शिकण्याच्या वयामध्ये मातापित्यांनी, शिक्षकांनी, थोरामोठ्यांनी सांगितलेले हिताचे बोल म्हणजे छिन्नी हातोड्यांचे घाव असतात. हे घाव नाकारणाऱ्या दगडांना पुढे आयुष्यभर परिस्थितीच्या नारळांचे घाव
सोसावेच लागतात.

Comments
Add Comment

गाईमुळे वाघाचा उद्धार

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पद्मपुराणातील एका कथेनुसार प्राचीन काळी एक प्रभंजन नावाचा धर्मपरायण राजा

ट्रोलिंग : दुसऱ्याला दुखावण्याचा परवाना नव्हे!

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. व्यक्त होण्यासाठी, विचार मांडण्यासाठी आणि समाजात

हम प्यार का सौदा करते हैं एक बार...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे काही गाणी लोकप्रिय होतात ती एखाद्या गायकाच्या गायकीमुळे, काही लोकप्रिय होतात

मित्र नको; बाबाच बना!

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू टीनएजमधल्या मुलांशी वागावं तरी कसं याबाबतीत मागील लेखात आपण किशोरावस्थेतील

सुधारणांच्या वाटेवर..

वेध : कैलास ठोळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते भारताने ‌‘रिफॉर्म एक्सप्रेस‌’मध्ये प्रवेश केला आहे.

सामान्य माणूस खरोखर दखलपात्र आहे?

दखल : महेश धर्माधिकारी  सामान्य माणसासाठी मतदान करणे हा हक्क आणि राष्ट्रीय कर्तव्यही असते. बोटाला शाई लावलेले