Saturday, May 17, 2025

रविवार मंथन

एका डोळियाने

एका डोळियाने

मोरपीस : पूजा काळे


जोवर डोळे आहेत, तोवर स्वप्न सत्यात उतरवणारी अमुक एक रेषा हातावर गोंदवून घेतो आपण. सत्य स्वप्नातल्या अस्पष्ट परिघात समजावत बसतो स्वत:ला. जसं की, धागा हलका असला तरी, असंख्य धाग्यांनी त्याला एकसंधपणा येतो. यात विरणाऱ्या धाग्यांची विण किती घट्ट, यापेक्षा जोडणाऱ्या धाग्याची लवचिकता महत्त्वाची ठरते. ही लवचिकता अंगिकारताना असंख्य वादळांना तोंड देण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी आलंय. अनामिका नामक नायिका जिने आपल्या कमकुवत मनावर मात केलीय. एखादा अनुभव तुम्हाला समृद्ध करतो हे म्हणणं खूप सोप्प असतं; परंतु तो सिद्धहस्ते घेताना त्यात ती व्यक्ती किती सहन करते, हे अनुभवापर्यंत गेलेल्यांनाच कळते. मनाची भाषा मनाला उमगते आणि त्या विषयीच्या तरल अवस्थेपर्यंत पोहोचते. तेव्हा मन आणि हृदयाव्यतिरिक्त, दुखाला वाट करून द्यायची इतर अवयवांची काय बिशाद होय? गमावलेला हात वा तुटलेला पाय असो, वा असो कुठलाही एखादा कमकुवत अवयव, तो अख्ख जग सहज हिंडू फिरू शकतो. पण डोळ्यांचं काय? ते तर जगजाहीर प्रकरण आणि हे प्रकरण अचानक काम करेनासे झाले तर. बघा तुम्हालाही प्रश्न पडला ना! किती महत्त्वाच्या विषयाला मी हात घातलाय तो! या सुंदर जगाची अनुभूती डोळ्यांशिवाय कशी घेणार हो!


जे-जे चांगलं ते-ते पाहून घ्यावे.
असा हा अगाध डोळ्यांचा महिमा.
डोळे हे जुल्मी गडे,
रोखूनी मज पाहू नका म्हणणारी प्रियतमा;


तिला तर केव्हाचं कळलेला असतो त्यातला रोखून बघण्याचा भाव. पाहण्यातला आनंद वर्णन करताना ‘रोखून’ या शब्दापाशी येत ती अडखळते. आजकाल या अनामिकेला हे असं काहीसं होतयं. प्रेमाच्या परीक्षेत पास व्हायला डोळ्यांची भाषा यायला हवी. भावनेची भाषा उमगणारे डोळे मनात आलेल्या कुठल्याही गोष्टीवर परिणाम साधतात. भावभावनेचा इशारा असो, वा रागाचा चढता पारा असो, मर्मभेदी डोळ्यांतून असा दर्शित होतो की “ उमलली एक नवी भावना, बघत राहू दे तुझ्याकडे.” असं म्हणत ती, सावध आणि सावजही होते.


डोळ्यांच्या भाषेचा विचार हा, मृगनयना रसिक मोहिनी, होती ती मंजुळ मधुरालापिनी... मृगनयना रसिक मोहिनी.


मासा गळाला लागण्याइतपत मोहिनीवजा बाणाचे तीर पटाईत असतात. यथार्थ अशा या गाण्याच्या ओळी खूप मागे घेऊन जातात. अनामिकेला, जेव्हा डोळ्यांना साधं दिसणंही बंद झालं होतं तेव्हाची भावना कमालीची भयंकर. वीज पडून जमीनदोस्त करणारी. भयानक वास्तव्य आ ऽऽऽ वासून पुढ्यात ठाकलेलं. डोळ्यांत मिट्ट काळोख दाटावा... रडणंही मुश्किल व्हावं. वीज अचानक बंद पडावी. लाल, हिरव्या, पिवळ्या वीजवाहक तारांनी पायात पाय घालून गुरफटून घ्यावं. या घडीला आलेला आंधळेपणा म्हणजे तात्कालिक बोर्डाचा बंदचा इशारा. समोर दाट अंधार. सारं जग थांबून सगळं संपुष्टात आल्याचा हाचं तो क्षण. वेदनेसोबत पुन्हा नव्या वेदना.


नव्या कोऱ्या जाणिवा. जग पाहण्याची स्वप्न डोळ्यांत उतरवत कितीतरी रात्री जागून काढल्याच्या तक्रारी तिचा चेहरा सांगू लागलेला. बोलू लागलेला. पण ती निग्रही. या अपार भवसागरात निश्चयाचा महामेरू उचलण्याची ताकद ठेवून सज्ज झालेली. असं म्हणतात की, स्वत:ला जसंच्या तसं स्वीकारलं की, दु:ख पसरायला वाट मिळत नाही. आतल्या आत विरून जात ते. फक्त हवा असतो तो विश्वास, जो निश्चित तिच्याकडे आहे. रंगहीन डोळ्यांनी बघितलेलं जग जटिल स्वप्नांनी भारलेलं, डोळ्यांसमोर नाचणाऱ्या चित्रविचित्र काळ्या बाहुल्या मनाचा संयम तोडणाऱ्या. महिन्याभरात उघडलेले डोळे नव्या स्वप्नांची नवी वाट दाखवतील, हा आशावाद घेऊन वावरताना. अनामिकेची अवस्था गाण्यातल्या नायिकेसारखी झालीय.


तुला पाहते रे, तुला पाहते जरी आंधळी मी, तुला पाहते...तुझी मूर्त माझ्या उरी राहते...रे...


एकीकडे तिच्या मनातलं अवकाश तर, पल्याड डोळ्यांच्या खोबणीत वसलेली स्वप्न. इवल्याशा रंगीत स्वप्नांचा मोरपिसारा फुलवत, डोळे आषाढ घनांची बरोबरी करण्यास सरसावलेत. जेव्हा आसमंत होईल लडिवाळ तेव्हा निळ्या पांढऱ्या शुभ्र टपोऱ्या अश्रूंची बरसात आभाळ मायेस स्पर्शून जाणारी ठरेल. ढगाळलेल्या वातावरणात धुंदी चढवत आलेला गार वारा झोका घेत स्वार होईल समुद्रावर. लाटा धडकतील किनाऱ्यावर. टपोऱ्या डोळ्यांत दाटून येतील नभ. डोळ्यांना मान्य नसेल कडेलोट आसवांचा पण बरसणाऱ्या पावसात चिंब होणाऱ्या अश्रूंना गवसेल वाट. गालावर ओघळणारे खारट पाण्याचे थेंब म्हणजे किनाऱ्याला सागराची ओढ. ओघळणारा पाऊस नक्षीदार छाप काढेल गालावर. प्रियतमेला सोडवणार नाही हा क्षण. हुंकार दाटेल, कोलाहल माजेल. समुद्राचा तळ गाठता येत नसला तरी, डोळ्यांना गवसणारा प्रितीचा किनारा हा असा बहरेल.


जिथे सागरा धरणी मिळते...तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते...


आषाढसरी नंतर पाणावलेले डोळे श्रावणसरीत भिजतील. मनोहारी हिरव्या-पिवळ्या वृक्षपर्णिचे अनाकलनीय गूढ उतरेल डोळ्यांत आणि त्याचवेळी तो बोलून जाईल सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला डोळ्यांच्या कडेकडेने साठेल सरबरीत पाऊस. ओलेत्या अंगणातली निळाई रूजवत जाईल पांढऱ्या पटलावर. अनामिकेचं आरशातलं प्रतिबिंब अजूनही धुसर धूसर, आपल्याचं सुंदर चेहऱ्याची ओळख पुसणार इतकं क्रूर. का? कशासाठीची? उत्तर अनामिकेकडे नसली तरी, अनवट वाटेच्या ब्लॅकआऊटमधून शिक्षा वजा शिकवणुकीचा मोठा धडा घेत तिने चालणं स्वीकारलयं. उघड्या दोन डोळ्यांना दिसणारी खाच खळग्यांची पूर्वीची दुनिया आणि या क्षणाचा एका डोळ्याने अनुभवलेला दाह, निर्माण झालेला दृष्टीदोष तिला आत्मविश्वास देईल, ज्यामुळे ती सिद्ध होईल एक पाऊल पुढे टाकण्यासाठी.

Comments
Add Comment