
नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड
साताई” “मला कुसुमताई म्हणा.” “मला कुसाताई मनापासून आवडतं.” “तुमच्या लहानपणी तुम्ही नंदुरबारला गेला होता मामांकडे, तेव्हा तिथे कुसाताई स्वयंपाक करायच्या ना? तुम्हाला त्यांची मुगाची खिचडी भारी आवडायची. बाईसाहेब नि तुमच्या आईसाहेब मला सांगत असतात साहेब.” “पण एकदिवस कुसाताईंनी घरात शिजवलेली खिचडी चोरली.” “हे खरं का?” “खरंच हो. मी कॉलेजात होतो. बाबांना फार राग आला.” “हो. काढून टाकलं कुसाताईंना. मागून खावं. चोरू नये, असं स्पष्ट सांगत होते तुमचे बाबा.” “घरात काहीच कमी नव्हतं.” “हो ना!” “तरी सुद्धा खिचडी चोरली. कुसाताईंनी!” “वाईटच केलं.” “हो ना ! मागितलं तर नवी खिचडी करून दिली असती घरी न्यायला.” “पण त्या खिचडीला, जमलेल्या खिचडीची न्यारी चव कशी आली असती साहेब?” “साहेब यावर निरुत्तर झाले. परत बाहेरच्या खोलीत गेले. नंतर परत आत आले. “तुम्हाला कुसाताईंची येवढी डिटेल माहिती कशी हो?” “बाईसाहेब गप्पा मारतात ना! त्यातून कळतात एकेक गोष्टी ! त्यांचे अण्णा मामा ! फार मोठे वकील होते ! नशिबाने त्यांचा पाय अधू होता! पण आपली शारिरिक पीडा त्यांनी कधी व्यवसायाच्या आड येऊ दिली नाही. पार हायकोर्टात खटला लढवायला मुंबईस यायचे. आलीशान हॉटेलात अशीलाला सोय करायला लावायचे. अशीलही तयार असे आनंदाने. कारण केस जिंकायला हवी असे ना ! मग अण्णांची इच्छा, सर आखोंपर ! शेवटी केस जिंकली की सारी भरपाई होई. अशील कृतकृत्य होत. अण्णामामा होतेच तसे कुशल वकील !” “अरे बाप रे ! तुम्हाला बरीच माहिती सांगितलेली दिसते हिने. बरं ! ते राहू दे! एकदा मला तुमचे घर बघायचे आहे.” “का हो साहेब?” “माझी नवी कादंबरी एका कुकवर आहे.” “अरे वा !” “अरे वा का? स्वयंपाकीण हा विषय दुर्लक्षित आहे. मी ‘अन्नपूर्णा’ असं नाव ठेवतो आहे पुस्तकाला.” “फार छान आहे नाव ! आवडलं मनापासून साहेब.” कुसाताई लवकरच साहेबांना घरी घेऊन गेल्या. गल्ली बोळ पार करता करता साहेब दमून गेले. शिवाय उघडी गटारं ! बापरे ! देवा ! कुठे जन्माला घातलंस या बाईला? अर्थात सोसायटीत जन्मली असती, तर पोळ्या कशाला लाटल्या असत्या लोकांकडे? साहेब एकदाचे घरी पोहोचले. “थांब हं... यांना शौचास झाली आहे. दोन्ही पाय कापले गेले आहेत. मी स्वच्छ करते. तोवर बाहेरची गंमत बघा ! साहेब, गमतीदार भांडणे ऐकायला मिळतील. माणसं एकेकांच्या ठरावर बसतात नि एकत्रच राहातात. अपरिहार्यपणे.” “अरे वा ! चांगलंच बोलता तुम्ही!” “शहाऐंशी टक्के होते दहावीला.” “वा ! फारच छान. पुढे शिकला का नाहीत? शिष्यवृत्ती मिळाली असती.” “या साहेब.” साहेब आत आले. “तुम्ही.” “हो. मीच तो. तुमच्याकडून पाय कापला गेलेला दुर्दैवी माणूस.” “यांना हे ठाऊक आहे?” “हो. पुरतं ठाऊक आहे.” तो बायकोकडे बघत म्हणाला. “तरी सुद्धा या आमच्यात पोळ्या करतात?” “कुसाताई पुढे झाल्या. म्हणाल्या. “मी एका अपघाताची सोबत आयुष्यभर करीत नाही साहेब. चुकत कोण नाही? सारेच कधी ना कधी चुका करतात. तुमच्या हातूनही चूकच झाली. पण ती मागे टाकली मी विसरले की दु:ख सरते. नि कर्तव्य उरते.’’ तो नव्याने शहाणा होत होता.