
नवी दिल्ली : भारतीय तपास पथकांनी देशविरोधी कारवाया करणाऱ्या तेरा जणांना देशाच्या विविध भागांतून अटक केली आहे. यात सहा यू ट्युबर आणि सात ओटीपी घोटाळेबाज यांचा समावेश आहे.

तपास पथकांनी ज्योती मल्होत्रा, देविंदर सिंग ढिल्लन, पलक शेर मसीह, सूरज मसीह, जाफर हुसेन आणि आणखी एक अशा एकूण सहा यूट्युबरना देशविरोधी कारवाया केल्याप्रकरणी अटक केली आहे. यू ट्युब व्हिडीओ तयार करण्याच्या निमित्ताने फिरताना देशातले सहा यू ट्युबर हेरगिरी करत होते. ते यू ट्युब तसेच वेगवेगळे स्मार्ट अॅप वापरुन फोटो, व्हिडीओ, टेक्स्ट अशा स्वरुपात देशाच्या सुरक्षेशी तसेच आर्थिक प्रगतीशी संबंधित महत्त्वाची माहिती शत्रूच्या हस्तकांना पुरवत होते.
हरियाणातील हिसारची ज्योती मल्होत्रा तसेच इतर यू ट्युबर सोशल मीडियात वेगवेगळ्या नावांच्या अकाउंटचा वापर करुन शत्रूच्या हस्तकांना माहिती पुरवत होते. यात ज्योती मल्होत्रा आघाडीवर होती. ज्योती किमान दोन वेळा पाकिस्तानचा दौरा करुन आली होती. तसेच भारतात तिने पाकिस्तानच्या दुतावासालाही भेट दिली होती. पाकिस्तानच्या दुतावासात काम करणाऱ्यांच्या थेट संपर्कात राहून ज्योती त्यांना माहिती शेअर करत होती. ज्योतीकडून मिळणारी माहिती पाकिस्तानचा अधिकारी स्वतःच्या देशातील वरिष्ठांना तसेच चीनच्या अधिकाऱ्यांनाही पाठवत होता. ज्योती एकाचवेळी पाकिस्तान आणि चीनसाठी भारतात हेरगिरी करत होती. ती यू ट्युब तसेच वेगवेगळे स्मार्ट अॅप वापरुन फोटो, व्हिडीओ, टेक्स्ट अशा स्वरुपात देशाच्या सुरक्षेशी तसेच आर्थिक प्रगतीशी संबंधित महत्त्वाची माहिती शत्रूच्या हस्तकांना पुरवत होती. ज्योतीला पाकिस्तान आणि चीनकडून प्रत्येकवेळी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात होती. पाकिस्तानमधील एका व्यक्तीशी तर ज्योतीचे खूपच जवळचे संबंध निर्माण झाले होते.
पाकिस्तानमधील तसेच भारतातील हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांसह वावरत असतानाचे ज्योतीचे अनेक फोटो तपास पथकांच्या हाती आले आहेत... वडील ऊर्जा विभागातून निवृत्त झाले होते. पण त्यांच्या पेन्शनच्या तुलनेत ज्योतीचे खर्च खूपच जास्त होते. या खर्चांसाठीचा पैसा ज्योती हेरगिरीच्या माध्यमातून मिळवत होती. ती एक चीनचा दौराही करुन आली होती. तिथेही ज्योतीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली होती.
ज्योती भारतातील पाकिस्तानच्या दुतावासात काम करणाऱ्या दानिशच्या संपर्कात होती. दानिशच्या माध्यमातून ज्योती पाकिस्तान आणि चीनच्या दुतावासातील इतर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली होती. भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर सुरू करण्याआधीच दानिशची देशातून हकालपट्टी केली आहे. भारतीय नागरिक असूनही भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या ज्योतीची आता कोठडीत रवानगी झाली आहे. ती पाकिस्तान, चीन, इंडोनेशिया, थायलंड, दुबई, भूतान, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांमध्ये फिरुन आली आहे. हेरगिरी करायला लागल्यानंतरच ज्योती ठिकठिकाणी जाऊन आली आहे. या प्रकरणी आता तपास पथक चौकशी करत आहे.
यू ट्युबर देशविरोधी कारवाया करत होते तसेच काही ओटीपी घोटाळेबाजही देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले होते. आसाम पोलिसांनी ओटीपी शेअर करून पाकिस्तानातील लोकांना भारतीय नंबरवरून व्हॉट्सअॅप वापरण्यास मदत करणाऱ्या ७ जणांना अटक केली. अटक केलेले सर्वजण ओटीपी शेअर करत होते. यातून एक देशासाठी धोकादायक असा गुन्हा घडत होता; असे पोलिसांनी सांगितले. पाकिस्तानी देशविरोधी कारवायांसाठी जे व्हॉट्सअॅप अकाउंट वापरत होते ते भारतीय आहे, असा भारतीय तपास पथकांचा समज होत होता. यामुळे पाकिस्तानींना देशविरोधी कारवाया करुनही प्रदीर्घ काळ सुरक्षित राहणे आणि स्वतःची खरी ओळख लपवणे शक्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले.