Sunday, May 18, 2025

कोलाज

चला महाराष्ट्र घडवूया

चला महाराष्ट्र घडवूया

काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा : श्रद्धा बेलसरे खारकर


देश बदलला पाहिजे असे सगळेच बोलतात, पण किती लोक त्यासाठी स्वतः प्रयत्न करतात? बऱ्याच लोकांना नक्की काय करायचे आहे हेही समजत नसते. आपल्याकडे बोलके सुधारक खूप आहेत. पण परवा मला सातत्याने निष्ठा ठेवून काम करणारा असा एक तरुण दिसला जो गेली २२ वर्षे हा प्रयत्न करतो आहे. त्याचे नाव आहे शिवराज पाटील. छोट्या खेड्यातून आलेला शिवराज जात्याच हुशार होता. त्याला अधिकारी व्हायचे होते. घरची परिस्थिती फारशी बरी नव्हती. मग त्याने जिद्दीने अभ्यास केला आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तो पहिल्या प्रयत्नात प्रिलीयम पास झाला. त्याला कलेक्टर व्हायचे होते. लेखी परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. भरपूर तयारी करून तो मुलाखतीसाठी दिल्लीला पोहोचला. पण तोंडी परीक्षा पास होऊ शकला नाही. कारण मुलाखतीचे तंत्र माहीत नव्हते आणि आत्मविश्वास, धीटपणा यांचा अभाव आडवा आला. निराश होऊन तो गावी परतला. काही दिवस निराशेत गेले. नंतर मात्र त्याने ठरवले ‘मला अपयश आले ते इतरांना येऊ नये यासाठी आपण काहीतरी करायचे. हाती पैसा नव्हता, घरचे पाठबळ नव्हते आणि महत्त्वाचे म्हणजे अनुभव नव्हता. त्याने स्पर्धा परीक्षा तयारीसाठी नव्या तरुणांना शिकवायचे ठरवले. पण कुठे शिकवणार? आणि या नवख्या तरुणाकडे शिकायला तरी कोण येणार? त्याने पुण्याच्या अनेक कॉलेजांमध्ये खेटे घातले. खूप वाईट अनुभव आले. फुकट शिकवणार आहे म्हटल्यावर ‘आम्हाला काय मिळणार?’ या त्यांच्या प्रश्नाला शिवराजकडे काहीही उत्तर नव्हते. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून काही तासांकरताही जागा द्यायलासुद्धा कुणी तयार नव्हते. पण तो हरला नाही.


रोज विविध ठिकाणी जाऊन शिवराज आपले म्हणणे सांगायचा. एखादा तास तरी जागा द्या अशी गळ घालायचा. अखेर एका कॉलेजने परवानगी दिली आणि त्याची शिकवणी सुरू झाली. कधी वर्ग मिळाले नाही, तर झाडाखाली शिकवले. शिवराजला फक्त अधिकारी तयार करायचे नव्हते, तर चांगला माणूस घडवायचा हे अवघड ध्येयही त्यांच्या मनात होते. हळूहळू घडी बसू लागली. एका दानशूर व्यक्तीने पुण्यात मध्यवस्तीत चार क्लास रूम दिल्या. रोजचे वर्ग सुरू झाले. शिवराजची शिकवणी मुलांना आवडू लागली. स्पर्धा परीक्षेची तयारी हा मोठा विषय आहे. फार मोठा अभ्यासक्रम असतो. प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे विषय निवडावे लागतात. साधारण लोकसेवा आयोगाच्या तयारीसाठी १० महिने लागतात. शिवराजच्या चांगल्या स्वभावामुळे त्याची एक टीम तयार झाली. सगळेजण ध्येयाने प्रेरित झाले होते. एक महत्त्वाचे तत्त्व ठरले होते. कुणाकडूनही कुठल्याही परिस्थितीत एकही पैसा घ्यायचा नाही.


एक घास फाऊंडेशन शिवराजने दूरचे नियोजन करून मग ‘एक घास फाऊंडेशन’ नावाची संस्था स्थापन केली. त्याच्या संस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व हे होतं की स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या मुलांना वर्षातून १० महिने शिकवायचे मात्र त्यांच्याकडून एकही रुपया घ्यायचा नाही. या मुलांना इतकेच सांगितले जाते की महिन्यात दोन दिवस फाऊंडेशनसाठी द्या. त्या दोन दिवसांत अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. काही विद्यार्थी नव्या बॅचला मोफत शिकवतात. पुण्यात अशाच प्रकारचे क्लास घेणाऱ्या वर्गाची फी आहे किमान एक लाख ते तीन लाख रुपये!


परीक्षेस बसणारे सारेच काही अधिकारी होत नसतात. काही तलाठी होतात काही इतर छोटीमोठी कामे करतात पण तो प्रामाणिक असला पाहिजे यावर शिवराजचा कटाक्ष असतो. खूप वेळ स्पर्धा परीक्षेत यश न आल्यामुळे मुले नाराज होतात. नैराश्यात जातात. पण आधीच सर्व शक्यतांची कल्पना दिल्यामुळे मुलांना सर्व गोष्टी स्पष्ट होतात. ‘एक घास’मध्ये शिकलेले आजवर ४५० लोक वर्ग १ ते वर्ग ३ मध्ये अधिकारी झाले आहेत. ते सर्व मनोभावे फाऊंडेशनचे काम करत आहेत. बार्टी या संस्थेमार्फत दरवर्षी अनेक मुलांना शिष्यवृत्ती आणि स्टायपेंड दिला जातो. त्यातल्या अनेक जणांना मोठे क्लासवाले घेतात. कारण महिना लाख रुपये प्रती विद्यार्थी मिळतात. शिवराजनी बार्टीला असा एक प्रस्ताव दिला की ज्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही त्यांना आम्ही एक रुपया न घेता शिकवू. तशी यावर्षीही डिसेंबरमध्ये नवीन बॅच सुरू झाली आहे.


तरुणात सरकारी पदांबद्दल प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे अशा क्लासेसना खूप मागणी आहे. मोठ्या शहरांच्या आसपास अनेक नामवंत संस्था स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या नावाने खूप पैसे मिळवतात पण शिवराज पाटीलांचा मात्र मोफत शिकवण्यावर भर आहे.


बहुतेक मुले १२ वी नंतर किंवा पदवी मिळाल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. पण स्पर्धा परीक्षेची माहिती जर शाळकरी वयात मिळाली, तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. म्हणून पाचवीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी असा एक उपक्रम सुरू केला आहे. विविध शाळांमध्ये हा उपक्रम सुरू झाला आहे. आठवड्यातून एक तास ही माहिती मुलांना दिली जाते. त्याचबरोबर दरमहा पालकांनाही सर्व माहिती दिली जाते. त्यामुळे मुलांबरोबर पालकांमध्येही जागरुकता येते. आता शिवराजचा २२ वर्षांत मोठा गोतावळा तयार झाला आहे. त्यातून नवे काही उपक्रम सुरू झाले आहेत. त्याच्या एक घास फाऊंडेशनतर्फे ५ अनाथाश्रमात दर महिन्याला शिधा पोहोचवला जातो. त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. मला जे महत्त्वाचे वाटते ते म्हणजे गरीब, दीनदुबळ्या लोकांविषयीशिवराजला असलेली तळमळ मी बघितले आहे की, अनाथाश्रमात शिधा पोहोचवायला गेल्यावर तो त्या मुलांबरोबर खेळतो, बोलतो त्यांच्यातला एक होतो. वृद्धाश्रमातले आजीआजोबा त्याची वाट बघत असतात.


शिवराज हे काम एकट्यानेच करत नाही. त्याची पत्नी मोनिका सर्वार्थाने त्याच्याबरोबर आहे. आजवर ४५० मुलांना अधिकारी करणारा आणि अडीच लाख मुलांना विनामूल्य शिकवणारा शिवराज नक्कीच महाराष्ट्र घडवेल अशी मला आशा वाटते आणि तो महाराष्ट्र प्रामाणिक आणि देशभक्त मुलांचा असेल हे महत्त्वाचे!

Comments
Add Comment