
नवी दिल्ली: भारतात अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप असलेला लष्कर-ए-तैयबा (LET) चा कुख्यात दहशतवादी सैफुल्ला खालिद पाकिस्तानच्या सिंध प्रांतात मारला गेला आहे. रविवारी सूत्रांनी ही माहिती दिली. त्याच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. २००१ मध्ये रामपूर येथील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, २००५ मध्ये बंगळुरूमधील इंडियन सायन्स काँग्रेस (ISC) वर हल्ला आणि २००६ मध्ये नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयावर हल्ला या तीन मोठ्या हल्ल्यांमध्ये खालिद प्रमुख सूत्रधार होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बदिन जिल्ह्यातील माटली तालुक्यात त्याला ठार करण्यात आले. हा दहशतवादयांचा नेता लष्करच्या दहशतवाद्यांना नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करण्यास मदत करत असे. त्यामुळे भारतीय भूमीवर लष्कर-ए-तैयबाच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली होती.
कोण होता सैफुल्ला खालिद?
सैफुल्लाह भारताविरुद्ध अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. सैफुल्ला उर्फ विनोद कुमार उर्फ मोहम्मद सलीम उर्फ खालिद उर्फ वनियाल उर्फ वाजिद उर्फ सलीम भाई अशी त्याची अनेक नावं आहेत. सैफुल्ला नेपाळमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या संपूर्ण दहशतवादी मॉड्यूलचे व्यवस्थापन करत असे. सैफुल्लाहचे मुख्य काम लष्कराच्या दहशतवादी कारवायांसाठी कॅडर आणि आर्थिक मदत पुरवणे होते. सैफुल्लाने एका नेपाळी नागरिक महिलेशी लग्न देखील केले होते. तो लष्कर आणि जमात उद दावासाठी भरती आणि निधी संकलनाचे काम करायचा. अलिकडेच त्याने पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बदिन जिल्ह्यातील माटली येथे आपले लपण्याचे ठिकाण बनवले होते. तिथून, तो लष्कर-ए-तैयबा, संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेला पाकिस्तानी दहशतवादी गट आणि त्याची आघाडीची संघटना जमात-उद-दावासाठी काम करत होता. या संघटनांचा उद्देश दहशतवादी कारवायांसाठी भरती करणे आणि निधी उभारणे हा आहे.