
मायभाषा : डॉ. वीणा सानेकर
लहानपणी चांदोबासारखे मासिक शाळेच्या वाचनालयात जाऊन वाचणे हा आमचा मधल्या सुट्टीचा आवश्यक भाग होता. त्यातल्या गोष्टी, रंगीत चित्रे हे सर्व आम्हाला अतिशय आवडायचे.
अलीकडच्या काळात वयमसारखे मासिक मुलांना आवडेल असे आहे. मराठीत मुलांच्या मासिकांची संख्या एकूण कमीच आहे. पण दर महिन्याला घरी असे खास आपल्याकरता मासिक येणे, मुलांनी त्याची वाट पाहणे आणि आल्यावर त्यात बुडून जाणे हे अत्यंत सकारात्मक चित्र आहे. ज्या पालकांना हे जमेल ती मुले सुदैवी! मराठीतून शिक्षण विषयक कोणती मासिके प्रकाशित होतात? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अत्यंत मोजकी नावे समोर येतात. शिक्षण संक्रमण, शैक्षणिक संदर्भ ही नावे गेल्या काही वर्षांत लक्षात राहिलेली आहेत.
छापील स्वरूपातील अंक प्रकाशित करणे दिवसे न दिवस कठीण होत चालले आहे. कारण खर्च अधिक आणि मागणी कमी अशी स्थिती आहे. यामुळे डिजीटल स्वरूपातील अंकाचा पर्याय समोर आला आहे. ‘ग्राममंगल शिकणवेध’ हा अंक शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा अंक म्हणून नावारूपाला आला आहे. याचे कारण म्हणजे रमेश पानसे यांच्यासारख्या निकोप शिक्षणविचार करणाऱ्या माणसाने त्याचे संगोपन केले. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या अवतीभवतीचे जग झपाट्याने बदलत गेले आहे. विविध क्षेत्रांमध्ये सखोल संशोधनातून मोठी क्रांती झालेली आहे. आपल्या जगण्याच्या पद्धती आणि शैलीत केवढी तरी उलथापालथ झालेली आहे. असुरक्षितता, अनिश्चितता, जुन्या मूल्य विचारांची पडझड या सर्व परिस्थितीत आजचे शिक्षण कसे असायला हवे हा कळीचा प्रश्न आहे. हाच विचार शिक्षणवेध सारखे मासिक मांडते आहे.
उच्चशिक्षण हा विषय बालशिक्षणाच्या भक्कम पायावर आधारित आहे. पूर्वी शिक्षकाने त्यास प्राप्त ज्ञान विद्यार्थांना देणे आणि त्यांनी ते ग्रहण करणे असा विचार केला जायचा, पण आता हा विचार बदलून ज्ञानरचनावादी विचार पुढे आला. त्यानुसार शिक्षकाने विद्यार्थांच्या मनात जिज्ञासा आणि कुतूहलाला जागे ठेवून शिकण्यास अनुकूल वातावरण उभे करून द्यायचे आहे. ज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक विद्यार्थी स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा हवा. त्याला अनेक प्रश्न पडले पाहिजेत. त्याकरिता तो सतत सजग हवा आणि मुक्तपणे शिकत राहण्याची प्रेरणा जोपासणारा हवा. असे विद्यार्थी घडण्यात पालक व शिक्षकांचे योगदान कसे असायला हवे, हे ‘ग्राममंगल शिक्षणवेध’ मधून मांडले जाते आहे.पालकांना गाईड, क्लाससारख्या गोष्टी मुलांकरिता हव्या असे वाटते. हे इतके टोकाला गेले आहे की, मुलांची उपजत शिकण्याची प्रेरणा संपवून परजीवी विद्यार्थी घडवले जात आहेत. एखादे मासिक घरी सुरू करणे हे पालकांना महाग का वाटते?
लहान मुलांचे शिक्षण नीट झाले तर समाजविकास योग्य दिशेने होईल, त्यामुळे अशा मासिकांना जगवणे ही सामुहिक जबाबदारी आहे. उचित शिक्षण विचाराचे वारे खेळते ठेवण्याकरिता एवढे करूयाच!