
दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
पाकिस्तानात जन्मली. एक वर्षांची असताना भारत-पाकिस्तान फाळणी झाली. अत्यंत हालाखीची परिस्थिती पाहिली, अनुभवली. जिद्दीने परिस्थितीला सामोरे जात भारतीय सैन्यातील सर्वोच्च अधिकारी पदापर्यंत पोहोचली. प्रत्येक भारतीयांसाठी अभिमान वाटावा अशी ही महिला अधिकारी म्हणजे लेफ्टनंट जनरल पुनिता अरोरा.
फाळणीनंतर लेफ्टनंट जनरल अरोरा एक वर्षाच्या असताना भारतात आल्या. भारतात पोहोचल्यावर त्यांच्या कुटुंबाकडे फक्त एक ब्लँकेट आणि पाण्याचा तांब्या होता. फाळणीचा तो काळ भयानक होता. पुनिताच्या कुटुंबाप्रमाणे दहा लाखांहून अधिक लोकांनी भारतात स्थलांतर केले होते. या सगळ्यांनी तो कठीण काळ अनुभवला. पुनिताच्या कुटुंबाने शून्यातून सुरुवात केली. पडेल ती कामे केली. काबाडकष्ट केले. मुलांना शिकवले. हे कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होते. तिचे बाबा भावंडांत मोठे होते. मात्र त्यांनी आपले भाऊ, बहीण त्यांचे कुटुंब यांची जबाबदारी देखील समर्थपणे हाताळली. अशा या एकत्र कुटुंब पद्धतीत पुनिता लहानाची मोठी झाली.
पुनिताचे सहारनपूरमधील सोफिया स्कूलमध्ये आठवीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर गुरु नानक गर्ल्स इंटर-कॉलेजमध्ये शिकली. ११वीत असताना त्यांनी मुलांसाठी असणाऱ्या सरकारी शाळेत प्रवेश घेतल्यानंतर विज्ञानाला करिअर म्हणून घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ती सहारनपूरमधील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेली तेव्हा महाविद्यालयाने तिला सांगितले की ते फक्त मुलांसाठी आहे पण जर तिला आणखी दोन मुली मिळाल्या, तर तिला जागा मिळू शकते. तिने तसे केले आणि प्रवेश मिळाला. ती १९६२ मध्ये पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये पदवीधर म्हणून रुजू झाली, पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्या बॅचची ती टॉपर ठरली. ज्या महाविद्यालयात शिकली तिथे ती शिक्षिका म्हणून शिकवू लागली. कालांतराने कमांड हॉस्पिटलमध्ये पोस्ट झाली आणि पुढे कमांडंट म्हणून सर्वोच्च पदावर पोहोचली. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावं ही पित्याची इच्छा पुनिताने पूर्ण केली.
आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज भारतातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक मानले जाते. पुनिता ज्यावेळेस या महाविद्यालयात शिकायला आली तेव्हा तिथे आवश्यक पायाभूत सुविधा नव्हत्या. तिथे वसतिगृह नव्हते. एका बॅरेकमध्ये २३ मुली असायच्या. आपल्याला येथे सर्वोत्तम शिक्षण मिळाले असे पुनिता म्हणतात.
पुनिता जानेवारी १९६८ मध्ये कमिशन मिळाले. भारतीय नौदलाच्या व्हाॅइस अॅडमिरल होण्यापूर्वी त्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या कमांडंट होत्या. २००४ मध्ये त्यांनी सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाच्या कमांडंटचा कार्यभार स्वीकारला आणि त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी झाल्या. त्यापूर्वी त्या सशस्त्र दलांच्या वैद्यकीय संशोधनाचे समन्वय साधत होत्या. सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (वैद्यकीय संशोधन) च्या अतिरिक्त महासंचालक म्हणून त्या लष्कराच्या मुख्यालयात सशस्त्र दलांच्या वैद्यकीय संशोधनाचे समन्वय साधत होत्या. एएफएमएसमध्ये एक सामायिक पूल असल्याने त्या सैन्यातून नौदलात गेल्या.
अंबाला येथे इंटर्नशिप केल्यानंतर एकवीस वर्षीय लेफ्टनंट पुनिता फतेहगड येथे आल्या. तोपर्यंत त्या बऱ्यापैकी मोठ्या शहरांमध्ये राहत होत्या. १९६८ मध्ये, फतेहगडमध्ये दरोडेखोरांचा वावर होता. त्यांनी यापूर्वी कधीही अशी जागा पाहिली नव्हती. प्रत्येकजण लाठी किंवा बंदूक घेऊन फिरत असे. मागे वळून पाहिल्यानंतर पुनिताला वाटते की यापेक्षा चांगली सुरुवात होऊ शकली नसती. या भागात जास्त रुग्णालये नव्हती. कोणतेही तज्ज्ञ डॉक्टर नव्हते. जवळचे मोठे रुग्णालय कानपूर किंवा लखनऊ येथे होते, जे चार ते सहा तासांच्या अंतरावर होते. त्या दिशेने जाणारी एकमेव ट्रेन मध्यरात्री निघायची. जर रुग्ण ट्रेन चुकला, तर डॉक्टरला त्याची काळजी स्वतः घ्यावी लागे. त्यामुळे पुनिताला डॉक्टर म्हणून खूप आत्मविश्वास मिळाला.
१९७१ ला जेव्हा पाकिस्तानशी युद्ध सुरू झाले, तेव्हा ती अजूनही फतेहगडमध्ये तैनात होती. याच दरम्यान तिचे लग्न झाले. तिचे पती देखील लष्करात डॉक्टर होते. ते श्रीनगरमधील बेस हॉस्पिटलमध्ये होते. ती तिच्या मुलाला जन्म देण्यासाठी या निसर्गरम्य शहरात आली होती. विमानतळावर ड्युटीवर असलेले तिचे पती बॉम्बहल्ला पाहत होते. पुनीताने जम्मू आणि काश्मीरमधील युद्धाची तयारी पाहिली. तेथील परिस्थिती तिच्या उत्तर प्रदेशातील तळापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. फतेहगडला कधीही युद्ध दिसले नाही. लोकांना काय घडत आहे हे फारसे कळायचे नाही. ‘‘तुम्ही तिथे [जम्मू आणि काश्मीरमध्ये] काय चालले आहे याची कल्पनाही करू शकत नाही. जर तुम्ही तिथे १५ दिवस घालवले, तर तुम्ही पूर्णपणे वेगळ्याच भावनेने परत याल.” असं पुनिता म्हणते. सशस्त्र दल रुग्णालयांमध्ये प्रसूती एंडोस्कोपी आणि ऑन्कोलॉजी सुविधा स्थापन केल्याबद्दल पुनिता अरोरा यांना भारताच्या राष्ट्रपतींनी सेना पदक प्रदान केले. जम्मू येथील लष्करी रुग्णालयाचे नेतृत्व करताना त्यांच्या नेतृत्वाखाली कालू चक दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना कार्यक्षम आणि जलद उपचार दिल्याबद्दल त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी विशिष्ट सेवा पदक प्रदान केले. लेफ्टनंट जनरल पुनिता अरोरा या भारतातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी भारतीय सशस्त्र दलाच्या दुसऱ्या सर्वोच्च पदावर म्हणजेच लेफ्टनंट जनरल पदावर आणि भारतीय नौदलाच्या पहिल्या व्हाॅइस अॅडमिरल पदावर काम केले आहे.
पुनिता यांचे अवघे कुटुंब लष्करात आहे. पती ब्रिगेडियर पी. एन. अरोरा यांनी लष्करात त्वचारोगतज्ज्ञ म्हणून सेवा केली. मुलगा स्क्वाड्रन लीडर संदीप अरोरा देखील नवी दिल्लीतील एअर फोर्स बेस हॉस्पिटलमध्ये त्वचारोगतज्ज्ञ आहे. त्यांची पत्नीही डॉक्टर आहे. मुलगी सबीनाने साडेसहा वर्षांच्या नोकरीनंतर कनेक्टिकटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी सैन्य सोडले. अशा या कुटुंबाचा प्रत्येक भारतीयास अभिमान वाटला पाहिजे. लेफ्टनंट जनरल पुनिता अरोरा यांची जीवनगाथा प्रत्येक भारतीयास प्रेरणा देणारी आहे. अशा महान व्यक्तीं पुढे ‘लेडी बॉस’ हा शब्द देखील खुजा ठरतो.