Sunday, October 26, 2025
Happy Diwali

एकता

एकता

स्नेहधारा : पूनम राणे

सकाळची वेळ होती. रोहनला खूपच भूक लागली होती. पोटात कावळे ओरडत होते. पाय मात्र काही स्वयंपाक घराकडे वळत नव्हते. हातही ठाण मांडून बसले होते. कान दुर्लक्ष करत होते. तोंड मात्र आतल्या आत पुटपुटत होते. बहुतेक आज पंचन्द्रियांनी हरताळ करायचा ठरवले होते. मेंदूच्या लक्षात आले, आज काहीतरी नक्कीच बिनसलं. त्यांनी चौकशी केली. तेव्हा तोंड म्हणाले, हे पाहा मेंदू राव, ‘‘इथला प्रत्येक अवयव मीच मोठा म्हणतोय! माझ्यामुळे सर्व होतंय असा प्रत्येकाचा समज आहे. त्यामुळे आज प्रत्येकाने हरताळ करायचे असे ठरवलय.” हे ऐकून मेंदूला फार वाईट वाटले. तो म्हणाला, ‘‘हे पाहा पोटाला खूप भूक लागलेली आहे. मला भोवळ आल्यासारखी वाटतेय. त्यामुळे थोड्याच वेळात डोळेही बंद होतील. जीव गुदमरायला लागेल आणि हे सर्व शरीर एखाद्या प्रेतासारखं जमिनीवर पडेल. तेव्हा आपल्या प्रत्येकाचे मोठेपण कुठे राहील सांगा बरं!’’ यावर जीभ म्हणाली, ‘‘अरे तू सांगतोस ते मी ऐकून जर बाहेर तोंड उघडलंच नाही, तर दुसऱ्याला कळणार कसे.” त्यामुळे मीच मोठी नाही का? जिभेचे ऐकून कान म्हणाला, हे बघ तू बोलतेस, ते जर मी ऐकलं नाही, तर पुढील सर्वच काम ठप्पच होणार! त्यामुळे मीच श्रेष्ठ! यावर हात म्हणाला, अरे तुम्ही बोललात, ऐकलात पण मी हालचालच केली नाही, तर मग काम कसे होणार ! त्यामुळे मीच श्रेष्ठ! यावर पाय म्हणाले, ‘‘हे पाहा तुम्हाला जे खायचे आहे, प्यायचे आहे ते घेण्यासाठी दोन पावलं चालावीच लागतात की, पण मी दोन पावलं चाललो नाही, तर ती वस्तू तुम्हाला कशी मिळेल?” त्यामुळे मीच सर्वश्रेष्ठ! या सर्वांच्या भांडणात मात्र मेंदूला चक्कर येऊ लागली. सर्व घर त्याच्यासमोर फिरतंय असे वाटू लागले. डोळे गरागरा फिरू लागले. डोळ्यांतून, तोंडातून पाणी येऊ लागले आणि रोहन जमिनीवर आदळला. डोळ्यांतील पाणी येताना पाहून हाताने हलकेच ते पाणी पुसले.” हे पाहून मेंदू हलक्या स्वरात म्हणाला, ‘‘हे पाहा आपल्या सर्वांचेच कार्य एकमेकांवर अवलंबून आहे. यातील एकाने जरी माघार घेतली, तरी या सृष्टीतील प्राणीमात्रांचे काही चालणार नाही. सर्व काही ठप्प होईल.’’ त्यामुळे एकजूट असणे हेच फार महत्त्वाचे असते. हाताची पाच बोटे एकत्र आल्याशिवाय मूठ सुद्धा वळत नाही आणि एका हाताने टाळी केव्हाच वाजत नाही. म्हणतात ना, एकीचे बळ मिळते फळ हेच खरे आहे. एकता हे जीवनमूल्य आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
Comments
Add Comment