
क्राइम : अॅड. रिया करंजकर
मानवी जीवन म्हणजे, आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येणारच. याचे एक समीकरण तयार झालेले आहे. खडतर आयुष्याशिवाय माणसाचे जीवन नाही. सरळ साध्या आयुष्याला कधी वळण मिळेल आणि आयुष्य अधोगतीच्या मार्गाला लागेल हे सांगता येत नाही.
देवेंद्र आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. उच्च शिक्षित नोकरी सांभाळून पुढील शिक्षण घेण्याची उत्सुकता असलेला तरुण तेवढाच कर्तबगार आणि समाजात वावरणारा अशी देवेंद्रची एक वेगळी ओळख होती. शैक्षणिक कोर्स करताना देवेंद्रची नीला हिच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री आणि मैत्रीमध्ये हळूहळू त्या दोघांमध्ये प्रेम फुलत गेले. नीलाचं देवेंद्रच्या घरी येणे जाणे होते. त्यामुळे देवेंद्रच्या घरचे सर्व तिला ओळखत होते. देवेंद्रचा पगार हा जेमतेम असल्यामुळे तो लग्नाचा विषय टाळत होता. आईची तब्येत दिवसेंदिवस खालवत चालल्यामुळे देवेंद्रच्या घरच्यांनी त्याच्या लग्नाचा विषय धरला. देवेंद्रने नीलाकडे लग्नाचा विषय काढला असता अचानक तिने माझ्या घरच्यांना पसंत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मानसिकरीत्या हतबल झालेल्या देवेंद्रने आपल्या घरातील लोकांना तुम्ही पसंत कराल त्या मुलीशी मी लग्न करीन असे सांगितले. घरातल्यांनी मुलगी बघून देवेंद्रचे लग्न लावले. त्याने मागचे सर्व काही विसरून आपल्या नवीन संसाराला सुरुवात केली. बायकोची साथ मिळाल्याने त्याने नोकरीसोबत दुकानाची सुरुवात केली. त्याची बायको दुकान सांभाळू लागली. अशाप्रकारे त्यांचा नवीन संसार सुरू झाला. त्याची बायको आधी आपला संसार आणि सासू-सासऱ्यांची चांगल्या प्रकारे सेवा करत होती. त्यांच्या लग्नाला एक वर्ष कसे झाले ते समजले नाही.
हळूहळू नीला देवेंद्रच्या मित्र-मैत्रिणीच्या मार्फत त्याला संपर्क करू लागली. देवेंद्र तिच्याशी संपर्क करत नव्हता. कारण त्याच्या आयुष्यात आता त्याची पत्नी होती आणि त्याचा सुखी संसार होता. ज्यावेळी लग्नासाठी विचारले होते त्यावेळी नकार दिला होता आणि आता ती का संपर्क करते असा प्रश्न त्याला निर्माण झाला होता. एक दिवस मैत्रीच्या मदतीने तिने देवेंद्रशी संपर्क साधला आणि मला फक्त एकदा भेट म्हणून देवेंद्रने तिला भेटायचे ठरवले. नेमकं काय चाललंय? आपण किती सुखात आहोत हे त्याला दाखवायचे होते. माझं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे. आपण लग्न करू असे नीला देवेंद्रला बोलू लागली. त्यावेळी तुला वेळ लागला. मी विवाहित आहे आणि माझी पत्नी खरंच चांगल्या स्वभावाची आहे. मी तिला फसवणार नाही असे तो बोलला आणि यापुढे माझ्याशी संपर्क करू नकोस असे तिला बजावले, पण नीला ऐकायलाच तयार नव्हती. जिथे देवेंद्र आहे तिथे ती त्याच्यामागून जाऊ लागली. माझी चूक झाली. मला माफ कर तू. माझा स्वीकार कर असे ती सतत देवेंद्रला बोलू लागली. म्हणून देवेंद्रने ही गोष्ट घरात सांगितली आणि त्याने आपल्या पत्नीलाही सांगितले. मी नेमकं काय करावे त्यावेळी त्याच्या पत्नीने समजूतदार भूमिका घेऊन तुमचे तिच्यावर प्रेम होते, तिच्याशी लग्न करा, माझ्याशी संसार करत राहिला, तर त्यात तुमचे मन राहणार नाही आणि देवेंद्रने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि नीलाशी लग्न केले.
नीलाला नुकसानभरपाई म्हणून काही रक्कम दिली. दरम्यान लॉकडाऊन सुरू झाले आणि देवेंद्रला नोकरीची अडचण निर्माण झाल्याने तो नीलाला घेऊन गावी आला. काही महिने गावी राहिल्यानंतर तो परत मुंबईला गेला. चांगली नोकरी शोधून नोकरी करू लागला. परिस्थिती बेताची असल्याने नीलाच्या सर्व गोष्टी पूर्ण करू शकत नव्हता. थोडे दिवस अॅडजस्ट कर आपली परिस्थिती बदलेल असे तो तिला समजवत होता. नीलाला देवेंद्रचे आई-वडील आपल्या सोबत राहिलेले नको होते. त्यामुळे ती सतत देवेंद्रला त्यांना गावी पाठव असे सांगत होती, पण देवेंद्रला ते मान्य नव्हते. कारण आई-वडील वयोवृद्ध होते. या गोष्टीचा राग आल्याने नीला आपल्या आई-वडिलांकडे निघून गेली. देवेंद्रने अनेक प्रकारे तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती समजण्याच्या मनस्थितीत नव्हती. याचवेळी तिने कोर्टामध्ये देवेंद्रच्या विरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज केला आणि पालनपोषणासाठी ५० लाखांची मागणी केली. पहिल्या पत्नीचा विचार न करता तिला घटस्फोट देऊन देवेंद्रने नीलाशी लग्न केले होते, पण नीलाने देवेंद्रच्या मनस्थितीचा विचार न करता त्याला घटस्फोट देण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. आयुष्य व्यवस्थित चालू असताना देवेंद्रने स्वतःहून आपल्या आयुष्याची बरबादी करून घेतली होती. जी मुलगी पहिल्यांदा लग्नाला नकार देते आणि लग्न झाल्यावर घटस्फोट घ्या आणि माझ्याशी लग्न कर असे सांगते यावरून ती कितपत साथ देणार होती याचा विचार देवेंद्रने केला नाही आणि प्रेमावर आंधळा विश्वास ठेवून देवेंद्र आता आर्थिक परिस्थितीत फसलाच होता, पण मानसिक दृष्ट्याही हतबल झाला होता. तिच्यावर मनापासून प्रेम केले तिनेच आता न्यायालय दाखवले होते. देवेंद्र आता न्यायालयात लढाई लढत आहे. पहिल्या पत्नीचीही तो माफी मागू शकत नव्हता. पहिल्या पत्नीने दुसरे लग्न करून आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली होती.
(सत्यघटनेवर आधारित)