Sunday, May 18, 2025

कोलाज

करियर निवड आणि गोंधळलेली मुले

करियर निवड आणि गोंधळलेली मुले

विशेष : आरती बनसोडे (मानसिक आणि करियर काउन्सलर)


पूर्वी दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाले की ठराविक करियर निवडले जायचे कारण करियर म्हणून निवडायला जास्त विकल्प उपलब्ध नव्हते, पण आताच्या परिस्थितीत घरोघरी पालकांची एकच लगबग सुरू असले ती म्हणजे आता पुढे अ‍ॅडमिशन कुठे घ्यायचे, कुठल्या वाटेला जायचे, कोणते करियर आपल्या मुलांसाठी योग्य असेल? वि‌द्यार्थ्यांची देखील तीच तारांबळ उडते. हल्ली करियरच्या इतक्या विविध वाटा उपलब्ध आहेत आणि त्यामुळेच हल्ली बालक आणि पालक दोघेही गोंधळात पडले आहेत.


पूर्वी करियर निवडीचा इतका गोंधळ झालेला आपण बघितला नव्हता पण हल्ली जितके जास्त विकल्प तितका जास्त गोंधळ होता. एका कोर्ससाठी शंभर महावि‌द्यालय उपलब्ध असतात मग त्यातून नक्की कोणते करियर अणि का निवडायचे हा देखील प्रश्न असतो. शिवाय हल्ली रेग्युल्लर पेक्षा इंटिग्रेटेड वि‌द्यालयात प्रवेश घेणे जास्त पसंत केले जाते. त्यामुळे नक्की आपल्यासाठी काय योग्य आहे या संभ्रमात पालक आणि वि‌द्यार्थी असतो.


सगळ्यांनी आधी हे समजून घेणे आवश्यक आहे की करियर म्हणजे नक्की काय आणि ते निवडताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतल्यास पुढील मार्ग सुखकर होईल?
करियरची निवड चुकीची नसते पण ती निवडल्यानंतर योग्य दिशा न मिळाल्यास नंतर मात्र पश्चातापाची वेळ येते. ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद, समाधान आणि सुखकारक जीवन जगण्या इतपत पैसे मिळतात, जी गोष्ट करताना आपल्याला थकवा जाणवत नाही, कुणी जबरदस्ती आपल्यावर लादल्यासारखे वाटत नाही त्या गोष्टी करिअर म्हणून निवडल्यास पुढे सुखकारक वाटते. कारण मानसिक समाधान आणि शांती या पुढील जीवनामध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. पण देखाव्याचे चकमकीत करियर आणि सहज पैसे कसे मिळतील यामुळे किशोरवयीन मुलांना करियर निवडताना ते समजत नाही.


शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण आपल्या आयुष्यातील दिवसाचे ८-९ तास काम करत असतो आणि अशा वेळेस आपण आपले न आवडते काम करत राहिलो तर जीवनाचा आनंद गमावून बसतो. करियर ही अशी गोष्ट आहे की एकदा घेतलेला निर्णय पुढे जाऊन बदलणे इतके सोपे नसते आणि यामध्ये वेळ आणि पैसे वाया जाऊन मुलांना व त्यांच्या कुटुंबियांना मनस्ताप होतो. त्यामुळे योग्य सल्ला घेऊन करियर निवडणे आणि निवडलेल्या करियरला यशस्वीपणे आनंदात निभावणे फार महत्वाचे असते. यासाठी मुलांच्या आवडीनिवडी, व्यक्तिमत्व, कल आणि त्यांची बु‌द्धिमता यांची सांगड घालून त्यांना दिशा दाखवणे ही पालकांची मूलभूत जबाबदारी आहे.


हल्लीच्या स्पर्धात्मक युगामध्ये मुलांचा भरपूर गोंधळ झालेला आढळतो, मुलांवर बऱ्याच प्रकारचा दबाव दिसून येतो आणि त्यातच पालकांच्या अपेक्षा, मार्कांची वाढलेली स्पर्धा यामुळेच मुलांवर मानसिक त्रास ओढवतो. म्हणून करियर निवडताना काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. मुलांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न करता त्यांच्या आवडीप्रमाणे करिअर निवडायला पालकांनी मदत करणे आवश्यक असते. आता पूर्वीप्रमाणे परिस्थिती राहिलेली नाही की हुशार वि‌द्यार्थ्यांनी सायन्स निवडावे, मध्यम बु‌द्धिमत्ता असलेल्या वि‌द्यार्थ्यांनी कॉमर्स निवडावे आणि कमी बुद्धिमत्ता असलेल्या वि‌द्यार्थ्यांनी कला क्षेत्र निवडावे आता हे चित्र बदलले आहे. आता वि‌द्यार्थी आवड असलेल्या क्षेत्रामध्ये उच्चतम शिक्षण घेऊन, उच्च स्तराला जाऊन आणि आपले टॅलेंट वापरून आपल्या आवडीच्या क्षेत्रात भरारी घेऊ शकतात. म्हणून पालकांनी वि‌द्यार्थी केवळ इंजीनियर डॉक्टर व्हावा या अपेक्षा बदलल्या पाहिजेत. हल्ली याच गोंधळामुळे वि‌द्यार्थी आणि पालक यांमध्ये मतभेद होऊन करियर काऊंन्स्लिंग ही संकल्पना जोर धरत आहे. ज्यामध्ये मुलांच्या विविध आयक्यू चाचण्या, अॅप्टिट्यूड टेस्ट, बेन मॅपिंग, डीएमआयटी अशा विविध चाचण्या करून मुलांचा कल ठरवून करिअर निवडीसाठी मार्गदर्शन केले जाते. या चाचण्यांचे निकष खरे असतीलच असे नाही, कारण वि‌द्यार्थ्यांची आवडनिवड, कल, व्यक्तिमत्व या गोष्टी मुलं आणि पालकांनी आपापसात चर्चा करणे अधिक प्रभावीपणे करियर निवडीसाठी उपयुक्त ठरते. बऱ्याचदा मुलांना करियर करायची इच्छा असते; परंतु घरातली आर्थिक परिस्थिती पाहता मुलांना त्यांच्या आवडीचे करियर करणे शक्य होत नाही. बऱ्याचदा मुलांना व पालकांना विविध नवीन क्षेत्रांची माहिती नसल्याने देखील त्यांना करिअरची निवड करणे जमत नाही.


हल्ली नृत्य, गायन किंवा चित्रकला यासारख्या सगळ्या क्षेत्रांमध्ये उच्चशिक्षण उपलब्ध आहे जे प्राप्त करून स्वतःचा व्यवसाय करता येतो. त्याचप्रमाणे परदेशामध्ये जाऊन नोकरी सोबतच आपल्या कला देखील सादर करता येतात. जग जवळ आले असल्याने भाषांतर करण्यासाठी जागतिक पातळीवर विविध भाषा येणे देखील एक चांगले करियर विकल्प आहे. त्याचप्रमाणे एनिमेशन, डिजिटल मार्केटिंग, डेटा सायंटिस्ट, डेटा अर्नलिस्ट, इन्फोटेक्नालाजी, सिनेमॅटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी यांसारख्या नवीन नवीन करियरच्या संधीदेखील मुलांसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. एरोनॉटिकल इंजिनीरिंग, एरोस्पेस इंजिनीरिंग, एव्हिएशन इंडस्ट्रीमधील करियर, ग्राऊंड स्टाफ, डिफेन्समधील करिअर, फॅशन डिजाइनिंग, इंटेरियर डिझाइनिंग, ब्यूटी निगडित करियर अशा अनेक संधी मुलांना उपलब्ध झालेल्या आहेत. एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळाले नाही म्हणून बऱ्याच मुलांचा आणि पालकांचा हिरमोड होतो; परंतु वैद्यकीय क्षेत्रातच विविध पॅरामेडिकल कोर्सेस करून बऱ्याच करियरच्या संधी उपलब्ध असतात.


ज्यांना प्राण्यांविषयी ओढ आहे, आवड आहे ते वेटरनरी डॉक्टर हा देखील पर्याय निवडू शकता. ज्यांचे वक्तृत्व चांगले आहे, स्टेजवर बोलायची भीती वाटत नाही, लोकांशी संवाद साधायला आवडतो त्यांच्यासाठी व्यावसायिक वक्ता किंवा प्रशिक्षक बनणे हा देखील पर्याय उपलब्ध आहे. कोणत्याही व्यवसायाला आपली आवड बनवून त्यातून पैसे कमावणं हे आतां इतकं कठीण राहिलेलं नाही; परंतु हल्लीच्या मुलांना कष्ट करायची वृत्ती नसून सहजपणे पैसे कसे कमावता येतील याकडेच त्यांचा अधिक कल असतो म्हणून हल्लीचा पालक आणि बालक दोघेही गोंधळलेले आहेत. ज्यांची कष्ट करण्याची तयारी असते त्यांना कोणतेही काम करण्याची भीती वाटत नाही आणि त्यातून पैसे कसे कमवायचे हा आपल्या बु‌द्धिमतेचा भाग असतो. आपली कौशल्य वापरून यातून उत्पन्न तयार करणे आणि आपल्या आवडी जोपासणे हे देखील हल्लीच्या पिढीला जमत नाही आणि त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होतो. शिवाय मोठमोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन, कार लोन अशा विविध कर्जामुळे देखील निवडलेल्या करिअरचा आनंद लुटता येत नाही. निवडलेल्या करियरमध्ये आनंद कसा मिळवायचा हे आपल्या हातात असते. निवडलेले करियर यशस्वी बनवणे आणि आनंदी राहणे जमले तर करियरच्या वाटा निवडताना भावनिक पसारा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment