
इच्छुक उमेदवारांची वाट खडतर
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपाने जय्यत तयारी सुरू केली आहे. अशातच, भाजपाचा मास्टर प्लॅन समोर आला आहे. तसेच लोकसभेचीच रणनीती महापालिका निवडणुकीत वापरण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षाचे जुने, अनुभवी आणि माजी नगरसेवक असलेले अनेक यंदाच्या निवडणुकीत डावलले जाण्याची शक्यता आहे. तसेच भाजपा नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याच्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पालिका निवडणुकीसाठी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी असल्याचे पाहावयला मिळत आहे. एका उमेदवारीसाठी चार ते पाच इच्छुक प्रत्येक ठिकाणी आहेत. त्यामुळे या इच्छुकांमधून योग्य उमेदवार निवडण्यासाठी भाजपाकडून विविध पातळ्यांवर सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची देखील नेमणूक करण्यात आली आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वेक्षण तीन स्तरावर करण्यात येणार आहे. केंद्रीय, प्रदेश पातळी आणि संघटनात्मक. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांना मोठ्या आव्हानांना सामोरे जाव लागणार आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उमेदवारी निश्चित करण्यासाठी अशाच प्रकारची रणनीती आखण्यात आली होती. त्याचप्रमाणे आता हाच फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीदेखील वापरण्यात येणार आहे.
निवडणुकांची जोरदार तयारी
महापालिकेच्या निवडणुका येत्या चार-पाच महिन्यांत होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढल्या जाणार की स्वबळाचा याचा ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. पण कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. दरम्यान नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, भाजपाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना कामाला लागा, अशा सूचना दिली आहे. पालिका निवडणुकांची पार्टीने जोरात तयार केली पाहिजे, आपला महापौर महापालिकेत बसला पाहिजे अशा पद्धतीने कामाला लागा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
आगामी निडणुकीत भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस आणि नाराजी उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण भाजपा नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या अनुभवी नेत्यांसाठी भाजपाची रणनीती डोकेदुखी ठरणार.
स्वबळावर लढण्याचा नारा?
स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढाव्यात, अशी मागणी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात फॉर्म्युलादेखील सांगितला. सरसकट युती न करता ज्या ठिकाणी स्वाभाविक युती होऊ शकते त्या ठिकाणी युती करण्यात येणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.