Sunday, October 26, 2025
Happy Diwali

राम मंदिरातील २५० पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

राम मंदिरातील २५० पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

अयोध्या : मागील काही महिन्यांमध्ये लाखो भाविकांच्या ओघामुळे अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रचंड सुरक्षा तैनात करण्यात आली होती.मात्र, आता गर्दीचा ओघ कमी झाल्याने मंदिर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेने या व्यवस्थेत बदल करण्यास सुरुवात केली असून २५० पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे. महाकुंभमेळ्याच्या काळात एसआयएस या खाजगी सुरक्षा एजन्सीतर्फे सुमारे ४५० सुरक्षा रक्षक मंदिर परिसरात तैनात करण्यात आले होते. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, एसआयएसने तब्बल २५० पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असून, त्यांचे प्रवेश पासही रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, मंदिर परिसरात अतिशय संवेदनशील जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे.

या मागचं कारण गर्दी आणि उत्पन्नात घट ही एक बाजू असली, तरी काही कर्मचाऱ्यांवर गैरवर्तन, शिस्तभंग आणि दर्शन-आरती पासांच्या नावाखाली अनधिकृत वसुलीचे गंभीर आरोपही असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मंदिराच्या सुरक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रामजन्मभूमीची प्रतिमा डागाळल्याची भावना काहींनी व्यक्त केली आहे. मात्र, मंदिर प्रशासन या संपूर्ण घडामोडींवर बोलण्यास टाळाटाळ करत आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही नियुक्ती व सेवा समाप्ती ही एजन्सी आणि संबंधित संस्थांमधील अंतर्गत बाब असून, मंदिर ट्रस्ट यामध्ये थेट सहभागी नाही. सध्या राम मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था पुन्हा संतुलित केली जात असून, उरलेल्या रक्षकांवर अधिक जबाबदारी पडली आहे. मात्र, ज्यांची उपजीविका या नोकऱ्यांवर अवलंबून होती, अशा कुटुंबांसाठी ही अचानक झालेली कपात मोठा आर्थिक धक्का ठरत आहे.

Comments
Add Comment