
कोकणवासीयांचा वनवास केव्हा संपणार?
मुंबई : समृद्धी महामार्ग वेगाने पूर्ण होतो, नवनवीन पूल वेगाने पूर्ण होताहेत, मात्र गेल्या १५ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलंय. कोकणवासीयांना गावी जाताना याचा चांगलाच अनुभव येतोय. मे महिना वाहतूक कोंडी आणि खड्ड्यातच गेला. आता गणपतीला तरी सुखाने कोकणात जाता येईल की नाही, याची चर्चा रंगलीय.
गेली १५ वर्ष मुंबई-गोवा महामार्गाचं काम रखडलंय. त्याचा फटका कोकणवासीयांना बसतोय. होळीचा शिमगा, मे महिना आणि गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. रेल्वेने जाताना तर जनावरांना कोंडून नेतात तसा प्रवास करावा लागतो. आणि मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करायचा तर खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सहा-सात तासांच्या प्रवासाला चक्क दहा ते बारा तास मोजावे लागतात.
यूपीए सरकारने २००७ मध्ये मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कोकणवासीयांचा वेळ वाचणार होता. मुंबई गोवा महामार्ग हा ४७१ किलोमीटरचा आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला २०१० मध्ये सुरुवात झाली. मात्र काही ना काही कारणास्तव कामात दिरंगाई वाढत गेली. त्यामुळे ज्या कामाला साडेसात हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता तो आता जवळपास १५ हजार कोटींवर पोहोचलाय. एवढं होऊनही मुंबई-गोवा महामार्गाचं काम अद्याप रखडलेलंच आहे.
?si=2fFNXttJlP5hj5jI
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात अनेक ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत, मात्र या उड्डाणपुलांच्या कामांनाही गती मिळालेली नाही. या महामार्गाचं काम कासवगतीने सुरू असल्यानं वाहनचालकांनाही त्याचा फटका बसतोय. पावसात महामार्गावरील खड्ड्यांचं साम्राज्य, वाहतूक कोंडी यांचा विचार करता तळकोकणात जाणारे प्रवासी आणि पर्यटक कोल्हापूर मार्गे जातात. माणगावजवळ होणारी वाहतूककोंडी ही पाचवीलाच पुजलेली आहे. दीड-दीड, दोन-दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पडायला होतं. या वाहतूक कोंडीचा माणगावकरांनाही त्रास होतोच, व्यापाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसतोय. वीकेण्डला तर माणगाव हा वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट बनतो.
मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी डेडलाईन दिल्या जातात, मात्र त्या पूर्ण होत नाहीत. या मे महिन्यात तरी चांगला प्रवास करता येईल असं कोकणवासीयांचं स्वप्न होतं, मात्र ते स्वप्नच राहिलं. त्यातच आता चार महिन्यांनंतर गणेशोत्सव येईल. पुन्हा कोकणवासीयांची गावी जाण्याची धडपड सुरू होईल. एकीकडे कोकण रेल्वेतून प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागतोय तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना खड्डे आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबई-गोवा महामार्गाचं काम केव्हा पूर्ण होणार या विचाराने कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.
समृद्धी महामार्गाचं काम वेगाने पूर्ण होतं. शिवडी ते उरण अटल सेतूवरून वाहतूक सुरू होते. दिघी-पुणे महामार्गही पूर्णत्वाला गेलाय. मग गेल्या १५ वर्षांपासून काम सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकणात अडथळे का येत आहेत, हा प्रश्न कोकणवासीयांना पडलाय. त्यांचा संताप होतोय. हा संताप आंदोलनाच्या मार्गाने बाहेर पडतोय. आता जून २०२५ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल, असं आश्वासन केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय. जून सुरु व्हायला आता काही दिवसच शिल्लक आहेत. याआधीही अनेक डेडलाईन दिल्या. पण येथील काम फारच संथगतीनं सुरुय. मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेगाने पूर्ण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा कोकणवासीयांनाच पाठपुरावा करावा लागणारेय. त्याशिवाय कोकणवासीयांचा मुंबई-गोवा महामार्गावरील खडतर प्रवास आणि वनवास संपणार नाही.