Saturday, May 17, 2025

ताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

एस. एम. देशमुख यांनी पत्रकारांसंबंधीत मांडलेल्या प्रश्नांचा शासन दरबारी पाठपुरावा करणार; मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

एस. एम. देशमुख यांनी पत्रकारांसंबंधीत मांडलेल्या प्रश्नांचा शासन दरबारी पाठपुरावा करणार; मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

सिंधुदुर्ग येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले अभिवादन


सिंधुदुर्ग : 'मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी पत्रकारांसंबंधीत विविध प्रश्न, समस्या आज या अभिवादन सभेत मांडले आहेत. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. यापुढेही यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा नक्की केला जाईल,' अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी येथे पार पडली. या कार्यक्रमात मंत्री राणे बोलत होते.


याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूर शेख, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी महिला अध्यक्ष शोभा जयपूरकर, सह प्रसिद्धी प्रमूख भारत निगडे, डिझिटल मीडिया परिषेदेचे अनिल वाघमारे, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरस्कर, परिषेदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले,'बदलत्या काळानुसार पत्रकारिता बदलत चाललेली आहे. पत्रकाराने पत्रकारिता करताना नैतिकता पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. आगामी काळात एआय सारख्या तंत्रज्ञानाचा देखील समावेश पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्या दृष्टीने ही पत्रकारांनी स्वतः मध्ये बदल करणे गरजेचे आहे.'




 

परिषदेच्या कामाचे केले कौतुक


पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, 'मराठी पत्रकार परिषद ही सर्वात जुनी असणारी संस्था असून येथे आज संपूर्ण महाराष्ट्रातून पत्रकार आले आहेत. यावरूनच या परिषदेचे महत्त्व अधोरेखित होत आहे. आगामी काळात परिषदेला शासकीय पातळीवर आवश्यक असणारी मदत करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील,' असेही त्यांनी सांगितले.


याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी सांगितले की, 'आज आपण एका महापुरुषाच्या भूमीमध्ये वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांची जन्मभूमी असणाऱ्या जिल्ह्यामध्ये येऊन अभिवादन करण्यासारखी भाग्याची दुसरी कोणतीही गोष्ट नाही. आज हे भाग्य आपल्या सर्वांना लाभले आहे. आज या ठिकाणी अहिल्यानगर, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बीड, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर अशा राज्याच्या विविध भागातून पत्रकार आलेले आहेत. खरंतर कोकणची भूमी ही महापुरुषांची भूमी आहे. येथेच बाबुराव पराडकर यांच्यासारखे हिंदी भाषेत आपलं वर्चस्व स्थापित करणारे पत्रकार घडले आहेत. त्यामुळे बाबुराव पराडकर यांचे ही स्मारक पराड येथे व्हावे, अशी आमच्या संघटनेची मागणी आहे.'


यावेळी एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांचे प्रश्न व त्यांना येणाऱ्या अडचणी सविस्तरपणे मांडतानाच त्या सोडवण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याची मागणी ही राणे यांच्याकडे केली.


जिल्हाधिकारी अनिल पाटील, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सिंधुदुर्ग पत्रकार जिल्हा संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, जिल्हा माहिती अधिकारी चिलवणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांनी तर सूत्रसंचालन गणेश जेठे यांनी केले.



आमदार निलेश राणे व दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा


मराठी पत्रकार परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर हे दूरध्वनीद्वारे सहभागी झाले होते. त्यांनी सर्व पत्रकारांचे स्वागत करताना सांगितले की, 'पत्रकारांना आवश्यक असणारे सहकार्य करण्यासाठी सरकार नेहमीच पुढे राहील. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे आमच्या जिल्ह्यातील होते, याचा आम्हाला अभिमान आहे.' तर आमदार नितेश राणे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करतानाच सांगितले की, 'देशाचे भविष्य हे पत्रकारितेवर अवलंबून आहे. आताची पत्रकारिता महत्त्वाच्या वळणावर आहे. अशा काळात आगामी काळात पत्रकारांनी देखील जबाबदारीने काम करताना वेळप्रसंगी आत्मपरीक्षण करण्याची ही गरज आहे.'



परिषद कार्यकारणीची झाली बैठक


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारणीची बैठक यावेळी पार पडले. या बैठकीत परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. तर बैठकीमध्ये सह राज्य प्रसिद्धीप्रमुख भारत निगडे, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, पुणे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनीही बैठकीत विविध प्रश्न मांडले.

Comments
Add Comment