Saturday, May 17, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या धोरणाची माहिती देण्यासाठी जगासमोर जाणार सात सर्वपक्षीय शिष्टमंडळं

दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या धोरणाची माहिती देण्यासाठी जगासमोर जाणार सात सर्वपक्षीय शिष्टमंडळं
नवी दिल्ली : भारतात दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे देश या सर्वांच्या विरोधात कारवाई करणार, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. देशाच्या याच भूमिकेची माहिती जगातील सर्व प्रमुख देशांना तसेच संयुक्त राष्ट्रांना करुन दिली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने जगातील प्रमुख देशांमध्ये तसेच संयु्क्त राष्ट्रांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.



एकूण सात सर्वपक्षीय शिष्टमंडळं जगातील वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहे. यापैकी मुख्य शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेस खासदार शशी थरुर करणार आहेत. हे शिष्टमंडळ अमेरिकेत जाणार आहे तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रतिनिधींना भेटणार आहे.

भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, जनता दल युनायटेडचे संजय कुमार झा, द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे सर्व खासदार वेगवेगळ्या शिष्टमंडळांचे नेतृत्व करणार आहेत. प्रत्येक शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांना भेट देऊन भारत सरकारची दहशतवादाविरुद्धची भूमिका समजावून सांगणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली.

देशहितापुढे राजकीय हेवेदावे, स्पर्धा हे सर्व दुय्यम आहे. दहशतवादाविरुद्ध भारत एकजूट आहे. हाच संदेश घेऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना आणि संयुक्त राष्ट्रांना भेट देणार आहे. राजकारणाच्या पलीकडे, मतभेदांच्या पलीकडे राष्ट्रीय एकतेचे एक शक्तिशाली प्रतिबिंब या प्रयत्नातून प्रकट होईल; असा विश्वास केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment